RTO Officer Action Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur News : बेशिस्त रिक्षांवरील कारवाई मागे घेण्यासाठी भाजप आमदार अन्‌ पदाधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांवर दबाव

RTO Officer Action : शिवसेना नेते तथा मंत्री भरत गोगावले यांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला होता. प्रकार ताजा असतानाच आता भाजप पदाधिकाऱ्यांनी घातलेला गोंधळ पुढे आल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजपबद्दल नाराजीचा सूर उमटत आहे.

भारत नागणे

Pandharpur, 14 June : परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरातील बेशिस्त रिक्षांवर कारवाई केली खरी. मात्र, ही कारवाई मागे घेण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोरच गोंधळ घातला. तसेच पंढरपूरचे भाजप आमदार समाधान आवताडे यांनीही कारवाई मागे घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे आग्रह धरला, त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करायची का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

नियमबाह्य पद्धतीने रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू असल्याने पंढरपूर (Pandharpur) शहरात परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, रिक्षांची कागदपत्रे जवळ नसणे यासह विविध कारणांमुळे परिवहन अधिकाऱ्यांनी पंढरपुरातील तब्बल 53 रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र, या कारवाईनंतर सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी परिवहन अधिकाऱ्यांसमोर गोंधळ घालत कारवाई मागे घेण्यासाठी आता धरला. पदाधिकाऱ्यांच्या या गोंधळामुळे नागरिकांमधून मात्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिवसेना नेते तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी मंदिर समितीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला होता. प्रकार ताजा असतानाच आता भाजप पदाधिकाऱ्यांनी (BJP office bearers) घातलेला गोंधळ पुढे आल्याने सत्ताधारी शिवसेना-भाजपबद्दल नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

एकीकडे भाजप पदाधिकाऱ्यांनी परिवहन अधिकाऱ्यांसमोर कारवाई मागे घेण्यासाठी गोंधळ घातलेला असतानाच भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनीही कारवाई मागे घेण्यासाठी परिवहन अधिकाऱ्यांना सांगितले. सत्ताधारी भाजप आमदाराने अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे समर्थन करण्याऐवजी कारवाई मागे घेण्यासाठी आमदार समाधान आवताडे यांनी आग्रह धरला आहे, त्यामुळे सजग नागरिकांमधून समाधान आवताडे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे.

कारवाई मागे घेणार नाही : परिवहन अधिकारी

भाजप पदाधिकारी आणि आमदाराकडून कारवाई मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असला तरी परिवहन अधिकारी कारवाईवर ठाम आहेत. याबाबत सोलापूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील म्हणाले, पंढरपुरातील नियमबाह्य आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्या 53 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांच्यावर तब्बल सात लाख 39 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे, कोणत्याही परिस्थितीत ही दंडात्मक कारवाई मागे घेतली जाणार नाही. यापुढेही ही कारवाई सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT