Satara, 06 April : विधानसभा निवडणुकीत झालेला धक्कादायक पराभव, त्यानंतर तब्बल 25 वर्षांनंतर होणाऱ्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी राज्यातील सत्तेच्या माध्यमातून उभा केलेले कडवे आव्हान, त्यांना महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांनी दिलेली साथ यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना चक्रव्यूहात अडकवण्याची जोरदार मोर्चेबांधणी झाली होती. मात्र, संयमाने आणि प्रसंगी कठोर होत पाटील यांनी विरोधकांचा चक्रव्यूह भेदण्यात यश मिळविल्याचे निवडणूक मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातील कलावरून स्पष्ट होत आहे.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची (Sahyadri Sugar Factory) मतमोजणी सध्या कराडमधील वखार महामंडळाच्या गोदाम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात एक ते पन्नास केंद्रातील मतपत्रिकांची मोजणी सुरू आहे. त्या मतमोजणीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनेलने आघाडी घेतली आहे. ही आघाडी आता तब्बल चार हजार मतांपर्यंत पोचली आहे. ही आघाडी वाढत जाण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे सह्याद्री कारखान्यातील बाळासाहेबांची गेली 25 वर्षांपासून असलेली सत्ता कायम राहण्याची शक्यता आहे.
भाजपचे मनोज घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीतील यशामुळे उत्साह संचारलेले घोरपडे यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने पाटील यांच्या राजकारणावर निर्णायक घाव घालण्याची तयारी केली होती. त्यासाठी सर्वपक्षीय पॅनेल उभारण्याची तयारी सुरू होती. त्याबाबतची बोलणीही अंतिम टप्प्यात होती.
महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी झालेल्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा फिस्कटली आणि त्या बैठकीतून काही नेते निघून गेले, त्यामुळे सर्वपक्षीय पॅनेलची स्वप्न अधुरे राहिले आणि तिथेच सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काहीअंशाने बाळासाहेब पाटील यांच्या बाजूने जाणार, हे स्पष्ट झाले होते.
ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी या निवडणुकीत भाजपचे आमदार मनोज घोरपडे यांना साथ दिली होती, तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आणि काँग्रेसचे निवास थोरात, भाजपचे कार्यकारणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांनी तिसरा पॅनेल उभारला होता. विशेष म्हणजे खासदार उदयनराजे भोसले यांनीही बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात काहींशी भूमिका घेतली होती.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिकाही बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात होती, हे उघड गुपीत आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेले उंडाळकर तर थेट विरोधात उतरले होते. त्यामुळे एकीकडे राज्यातील सत्ताधारी भाजपचा आमदार, त्यांना काँग्रेसमधील बड्या नेत्यांची असणारी दृश्य-अदृश्य साथ यामुळे बाळासाहेब पाटील हे चोहोबाजूंनी घेरले होते.
माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शांतपणे संयमी पावले टाकत विरोधकांचे सर्व डाव उधळून लावत सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. निष्ठावंत सहकाऱ्यांना सोबत घेऊन बाळासाहेब पाटील यांनी सह्याद्री साखर कारखान्याची सत्ता कायम राखण्याच्या दिशेने घौडदौड सुरू केली आहे. आता ही घौडदौड रोखण्यात विरोधकांना कोणत्या भागात यश येते का, हे पाहावे लागेल.
शिवेंद्रराजेंची भूमिका निर्णायक
या सर्व घडामोडीत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तटस्थ भूमिका घेतल्याचे दिसून आले. एकमेकांच्या सहकारी संस्थांमध्ये लक्ष घालायचे नाही, अशी प्रथा जिल्ह्यातील राजकारणात आधीपासून आहे, त्यामुळे आतापर्यंत सर्व नेत्यांनी ही प्रथा पाळली आहे. आमचाही अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना आहे. आमच्याही काखान्याची दर पाच वर्षांनी निवडणूक हेाते, त्यामुळे आतापर्यंत कोणी एकमेकांच्या संस्थेत लक्ष घातलेले नाही, त्यामुळे सत्ता कोणाला द्यायची, हा निर्णय सभासदच घेतील, असे शिवेंद्रराजे यांनी म्हटले होते, त्यामुळे शिवेंद्रराजे भोसलेंची भूमिका ही बाळासाहेब पाटील यांना साहाय्यभूत करणारी ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.