Balasaheb Patil-Prithviraj Chavan-Atul Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad Politic's : एकहाती सत्तेचं स्वप्न बघणाऱ्या भाजपला पवारांच्या शिलेदाराने घेरलं; पृथ्वीराजबाबांची भूमिकाही पथ्यावर पडणार

Nagar Parishad Election 2025 : कराड नगरपालिका निवडणुकीत भाजप आणि लोकशाही-यशवंत विकास आघाडीत थेट सामना होत असून काँग्रेस केवळ १३ जागांवर उतरल्याने प्रभागनिहाय लढती अधिक चुरशीच्या आणि निर्णायक ठरत आहेत.

सचिन शिंदे

कऱ्हाड नगरपालिकेच्या निवडणुकीत मुख्य लढत भाजप विरुद्ध लोकशाही–यशवंत विकास आघाडी अशी असून काँग्रेसकडे केवळ १३ उमेदवार राहिल्याने ती मुख्य स्पर्धेतून मोठ्या प्रमाणात बाहेर आहे.
प्रभागनिहाय स्थानिक असंतोष, बंडखोरी, मतविभागणी आणि प्रभावी स्थानिक गट यांच्या जोरावर बहुतेक ठिकाणी तिरंगी किंवा बहुरंगी चुरशीच्या लढती तयार झाल्या आहेत.
बाळासाहेब पाटील–यादव जोडीची मोट, भाजपचे अंतर्गत मतभेद, काँग्रेसची कमकुवत तयारी आणि प्रभागनिहाय स्थानिक समीकरणे ही या निवडणुकीची निर्णायक सूत्रे ठरणार आहेत.

Karad, 24 November : कऱ्हाड नगरपालिकेच्‍या निवडणुकीत मुख्य सामना भाजप विरुद्ध लोकशाही-यशवंत विकास आघाडीतच होत आहे. मागील वेळी नगरपालिकेत काँग्रेसप्रणीत यशवंत जनशक्ती विकास आघाडीची सत्ता होती. मात्र, यंदा काँग्रेसला पूर्ण जागा लढवता आलेल्या नाहीत, तर भाजप पूर्ण ताकदीने उतरली असून, लोकशाही-यशवंत विकास आघाडीने थेट लढत दिली आहे. काँग्रेसने नगराध्यक्षपदासह केवळ १३ जागांवर उमेदवार उभे करत वेगळी खेळी खेळली असल्‍याने, प्रभागातील लढती निर्णायक व चुरशीच्या ठरणार आहेत.

कऱ्हाड (Karad) पालिकेत १५ प्रभागांतून ३१ जागा निवडायच्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी पूर्ण ताकदीने लक्ष न घातल्याने पक्षाची त्रेधातिरपीट उडाल्‍याचे दिसून येत आहे. त्या उलट समविचारींना एकत्र आणून माजी मंत्री बाळासाहेब पाटील व राजेंद्रसिंह यादव यांनी बांधलेल्या मोटीने शहरात वातावरण निर्माण झाले आहे. एकहाती सत्ता घेण्याचे भाजपचे स्वप्न त्‍यामुळे भंगले आहे.

भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले (Atul Bhosale), प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आखलेल्या राजकीय खेळ्या आघाड्यांच्या एकत्रीकरणाने असफल ठरल्या आहेत. काँग्रेसला प्रभाग क्रमांक दोन, सहा, सात, आठ, दहा, १४ येथे एकही उमेदवार देता आलेला नाही. केवळ १३ उमेदवार त्यांचे आहेत. एक, चार, नऊ तेरा व १५ या प्रभागामध्ये केवळ एकच उमेदवार आहे. त्यामुळे पालिकेची निवडणुकीतील मुख्य लढत भाजप विरुद्ध लोकशाही- यशवंत विकास आघाडी यांच्यात आहे.

काँग्रेसला उमेदवारच मिळाला नाही

नदीकाठचा भाग नागरी वस्तीचा व पुन्हा चावडी चौकाकडे रस्त्याचा प्रमुख मार्ग अशी रचना असलेल्या प्रभागात आघाडीचे नेते माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून कुणबी दाखल्यामुळे उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची लढत भाजपच्या संजय कांबळे यांच्याशी आहे. या गटात काँग्रेसला (Congress) उमेदवार मिळाला नाही. त्याच प्रभागातील महिला गटातही काँग्रेसने हुमेरा शेख, लोकशाही-यशवंतने रूपाली माने व भाजपने सुरेखा काटकर यांना उमेदवारी दिली आहे. तीनही उमेदवार नवखे आहेत, तरीही नागरिकांच्या मागास प्रवर्ग गटातील लढत महिला गटातही तितकीच परिणामकारक व चुरशीची ठरणार आहे.

कदम, पवारांच्या ऐकीचे भाजपपुढे आव्हान

प्रभाग दोनमध्ये आघाडीचा प्रभाव आहे. हद्दवाढीच्या या प्रभागात माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्राबल्य आहे. तेथे भाजपचा विकासावर रान पेटवण्याचा प्रयत्न आहे. या प्रभागात काँग्रेसचा उमेदवार नाही. भाजपकडून भाग्यश्री साळुंखे व समीर करमरकर, तर लोकशाही-यशवंतने नीलम कदम व माजी नगरसेवक सुहास पवार यांना उमेदवारी दिली आहे. कदम व पवार यापूर्वी एकमेकांविरोधात होते. त्यांचे एकत्रीकरण झाल्याने आघाडी मजबूत झाली आहे, तर भाजपच्या नवख्या उमेदवारांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

महिलांमध्‍ये तिरंगी लढत

प्रभाग क्रमांक चारमध्ये आघाडीसह भाजपचाही प्रभाव आहे. मागील वेळी क्रॉस वोटिंगमुळे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर विजयी झाले होते. महिला गटातून आघाडीच्या प्रियांका यादव विजयी झाल्या होत्या. क्रॉस वोटिंगचा इतिहासामुळे लोकशाही-यशवंतने माजी नगरसेविका प्रियांका यादव, अर्चना ढेकळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने तेथे स्वाती मोहिते यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने महिला गटात उमेदवारी दिलेली नाही.

शिवसेना शिंदे गटाचे रणजित पाटील यांच्या पत्नी शैला पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे महिला तिरंगी लढत आहे. येथे मतविभागणी महत्त्वाचा फॅक्टर आहे. अनुसूचित जाती खुल्या गटात आघाडीने ढेकळे, काँग्रेसने आनंदा लादे, तर भाजपने शिवाजी रामुगडे यांना उमेदवारी दिली आहे. ढेकळे, लादे माजी नगरसेवक आहेत, तर रामुगडे नवखे आहेत.

आयात उमेदवारी

तगडे नेते असलेल्‍या प्रभाग पाचमध्‍ये भाजप कुमकवत असल्याने त्यांना उमेदवार आयात करून निवडणूक लढवावी लागली आहे. पहिल्या महिला माजी नगराध्यक्षा अर्चना पाटील यांना काँग्रेसने महिला प्रवर्गातून उभे केले आहे. त्यांच्याविरोधात माजी नगरसेविका अरुणा पाटील व मनसेच्या शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या पत्नी रेवती बर्गे यांना उमेदवारी दिल आहे. येथे लोकशाही व काँग्रेसची ताकद असतानाही भाजपने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.

दुसऱ्या गटातही भाजपने शुभम लादे, काँग्रेसने योगेश लादे, आघाडीने राहुल भोसले यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यासह अपक्ष राजेंद्र कांबळे रिंगणात आहेत. प्रभागात भाऊ बंधकीचा फटका कोणाला बसणार यावर विजय ठरणार आहे.

पावसकर चक्रव्यूहात

प्रभाग सातमध्ये काँग्रेसने उमेदवार दिलेले नाहीत. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर यांचे पुत्र व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे बंधू अजय पावसकर यांच्या भाजपच्या उमेदवारीला घेरण्यासाठी लोकशाही-यशवंत विकास आघाडीने जयंत बेडेकर व चार अपक्षही तयारीत आहेत. येथे मतविभागणीतून विजयाचे गणित आहे. नागरिकांचा मागास महिला प्रवर्गातही टस्सल आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अंजली कुंभार यांना उमेदवारी आहे. येथे लोकशाही-यशवंत आघाडीचा येथे उमेदवारीचा घोळ आहे. भाजपचे पदाधिकारी सुदर्शन पाटसकर यांच्या पत्नी तेजश्री पाटसकर यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले आहे. प्रिया आलेकरी, वंदना गायकवाड यांच्याही उमेदवारी असल्याने येथे बहुरंगी लढत आहे.

बालेकिल्‍ल्‍यातच प्रतिष्‍ठा पणाला

प्रभाग क्रमांक नऊ जनशक्ती आघाडीचा प्रभाव असलेल्या प्रभागात सर्वसाधारण खुला व सर्वसाधारण महिला असे आरक्षण पडल्याने शहरात सर्वाधिक चुरस याच प्रभागात होत आहे. माजी उपाध्यक्ष फारुक पटवेकर यांच्या पत्नी मिनाज पटवेकर यांनी लोकशाही-यशवंतकडून तर जनशक्तीच्या शमीम बागवान यांना उमेदवारी आहे. सर्वसाधरण खुल्या जागेत माजी नगराध्यक्षा विद्याराणी साळुंखे यांचे बंधू प्रताप साळुंखे यांची आघाडीतून, तर जनशक्ती आघाडीतून माजी नगराध्यक्ष (कै.) जयवंतराव जाधव यांचे पुत्र आशुतोष जाधव यांची उमेदवारी आहे. अपक्ष समीर पटवेकर यांचेही आव्हान आहे. भाजपने प्रभाग जनशक्तीला दिल्याने जनशक्तीच्या बालेकिल्ल्यात त्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

मतविभागणी निर्णायक

प्रभाग दहा हा काँग्रेसचा बालेकिल्ला. तेथेही काँग्रेसला उमेदवारच देता आला नाही. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे बंधू व काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ऋतुराज मोरे यांनी अर्ज माघार घेतल्याने तेथे राजकीय स्थित्‍यंतरे झाली. भाजपने खुल्या प्रवर्गातून सुमीत जाधव यांना उमेदवारी दिली. मात्र, आघाडीत उमेदवारीचा पेच आहे. लोकशाहीकडून यशराज सुर्वे, तर यशवंतकडून मोहसीन कागदी यांची उमेदवारी आहे. प्रताप इंगवले व नागेश कुरले अपक्ष आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटात आमदार डॉ. अतुल भोसले यांचे निकटवर्तीय किरण मुळे यांच्या पत्नी मनीषा मुळे व आघाडीचे युवा नेते ओंकार मुळे यांची आई आशाताई मुळे यांच्यात दुरंगी थेट लढत आहे. भोई समाजाच्या मतांची विभागणी येथे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

विजयसिंहही रिंगणात

प्रभाग १२ मध्ये यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव यांचे बंधू विजयसिंह यादव लोकशाही यशवंत विकास आघाडीकडून पालिका निवडणूक रिंगणात आहेत. त्यांचे पारंपरिक विरोधक माजी नगरसेवक इंद्रजित गुजर यांचे पुत्र वीरेंद्र गुजर यांना भाजपने उतरवले आहे. काँग्रेसने या गटात माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार यांचे पुत्र शहारूख शिकलगार यांना उमेदवारी दिली आहे. श्री. शिकलगार यांनी आघाडीचे समर्थन केले असतानाही त्यांच्‍या पुत्राने येथे काँग्रेसमधून शड्डू ठोकला आहे. गणेश कापसे, श्रीकांत घोडके, जय सूर्यवंशी अशा अपेक्षांचे आव्हान आहे. दुसऱ्या गटात भाजपने स्‍मिता धोत्रे, काँग्रेसने रुकैय्या मुलाणी, तर लोकशाही-यशवंत विकास आघाडीने अनिता पवार यांना उमेदवारी दिली आहे. महिला गटात अनिता पवार माजी नगरसवेक (कै.) प्रभाकर पवार यांच्या पत्नी आहेत.

भावकीचा पाठिंबा निर्णायक

प्रभाग १४ मध्ये पुन्हा काँग्रेसने उमेदवार न दिल्याने भाजप विरुद्ध लोकशाही-यशवंत विकास आघाडीत लढत आहे. तेथे भाजपने शिवाजी पवार यांना उमेदवारी दिली आहे. श्री. पवार यांना भावकीतून किती पाठिंबा त्यावर भाजपच्या विजयाचे सूत्र ठरणार आहे. त्यासाठी एकत्रित प्रचार यंत्रणा महत्त्वाची आहे. त्यांच्या विरोधात लोकशाही-यशवंतने किरण सूर्यवंशी यांना रिंगणात आहेत. अपक्ष इंद्रजित भोपते यांनाही आव्हान दिले आहे. त्यामुळे तिरंगी लढत भावकीच्या मतदानावर ठरणार आहे. भाजपच्या वर्षा वास्के यांच्या विरोधात प्रियांका बोंगाळे यांना आघाडीने उतरवले आहे. त्यांच्यात थेट दुरंगी लढत आहे.

दोन गटांवर तिसऱ्याचे भवितव्‍य

प्रभाग १५ मध्ये भाजपने माजी नगरसेविका संगीता शिंदे, पूनम घेवदे व विश्वनाथ फुटाणे, तर लोकशाही-यशवंत विकास आघाडीने तेथे सुप्रिया खराडे, अख्तर आंबेकरी व योगिता जगताप यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने तीनऐवजी एकच हसीना मुल्ला यांना उमेदवारी दिली आहे. त्यात माजी नगरसेविका सुप्रिया खराडे व संगीता शिंदे एकमेकांसमोर आहेत. त्या दोघींचाही चांगला संपर्क आहे. पालिकेत कामाचा अनुभव आहे. त्यामुळे ती लढत महत्त्वाची आहे. अख्तर आंबेकरी यांचे पुत्र यापूर्वी पालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या विरोधात भाजपने सामान्य कुटुंबातील विश्वानाथ फुटाणे यांना उमेदवारी दिली आहे. तिसऱ्या जागेसाठी दोन्ही आघाड्यांचे उमेदवार नवखे आहेत. त्यामुळे अन्य दोन गटांवरच त्यांची लढत अवलंबून आहे.

उ: मुख्य सामना भाजप विरुद्ध लोकशाही–यशवंत विकास आघाडी असा आहे.

प्र.2: काँग्रेसने किती जागांवर उमेदवार उभे केले आहेत?
उ: काँग्रेसकडे केवळ १३ उमेदवार आहेत.

प्र.3: निवडणुकीत तिरंगी किंवा बहुरंगी लढती का वाढल्या?
उ: काँग्रेसची कमजोरी, भाजप–शिवसेना बंडखोरी आणि आघाडीतील एकत्रीकरणामुळे बहुरंगी लढती निर्माण झाल्या.

प्र.4: कोणते स्थानिक घटक निवडणुकीत निर्णायक ठरणार आहेत?
उ: मतविभागणी, स्थानिक गटांची ऐक्ये, बंडखोर उमेदवार आणि सामाजिक वर्गांचे मतपॅटर्न.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT