Satara ZP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP President : साताऱ्यात राष्ट्रवादीचा गेम : भाजपने ऐनवेळी हुकमी एक्का बाहेर काढला; पळवापळवी अन्‌ केसेस, 24 तासांत बरंच काही घडलं...

BJP Vs NCP-Shivsena : साताऱ्यात भाजपच्या रणनीतीतून प्रिया शिंदे अध्यक्ष व राजू भोसले उपाध्यक्ष झाले. शिवसेनेत फूट आणि राष्ट्रवादीचा पराभव यामुळे जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

Vijaykumar Dudhale

Satara, 20 March : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाच्या प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची नाट्यमय घडामोडीनंतर निवड झाली आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने सर्व अस्त्रांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपने शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्या पत्नीला उमेदवारी देऊन पद्धशीरपणे गेम खेळल्याचे दिसून येते. मात्र, मिनी मंत्रालयाच्या सत्तेच्या सारीपाटात राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम कोणी केला, अशी चर्चा रंगली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपला सहा मतांची गरज होती, तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी एकत्रित राहणार असल्याचे सांगितले हेाते. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीचे पारडे जड मानले जात होते. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष साताऱ्याकडे लागले होते.

साताऱ्यात गुरुवारी (ता. १९ मार्च) रात्रभर अनेक घडामोडी घडल्या. त्यात राष्ट्रवादीच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांचे अपहरण झाल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषद सदस्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन आम्ही स्वतः पक्षासोबत गेल्याचे लेखी दिले आहे, असे राष्ट्रवादीचे खासदार नितीन पाटील यांनी सांगितले.

आणखी एका सदस्यावर गुन्हा दाखल झाल्याची चर्चा आहे. मात्र, त्याला खासदार नितीन पाटील यांनी दुजोरा दिलेला नाही, त्यामुळे सत्तेच्या राजकारणात अनेक शह-कटशहाचे राजकारण रंगल्याचे साताऱ्यात दिसून आले.

प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी भाजपने मोठा गेम खेळत शिवसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी दिली, तर उपाध्यक्षपदासाठी भाजपचे राजू भोसले यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.

सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य फुटल्याची चर्चा होती. त्याला खासदार नितीन पाटील यांनी दुजोरा देताना आमच्या दोन सदस्यांना दोन दिवसांपूर्वी उचलून नेण्यात आले आहे, असा आरोप केला आहे. तसेच, शिवसेनेचाही एक सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे, त्यामुळे साताऱ्यात गेल्या चोवीस भाजपने गेम फिरवत जिल्हा परिषदेची सत्ता आपल्या बाजूला फिरवण्यात यश मिळविले आहे.

सातारा झेडपीत बहुमताचे असूनही भाजपपुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस-शिवसेनेला अपयश आले. नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सातारा झेडपीत भाजपचीच सत्ता आली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात करुन दाखवले आहे.

दरम्यान, शिवसेना आमदाराच्या पत्नीला उमेदवारी भाजपने जोरदार माईंड गेम खेळला. दुसरीकडे तीन सदस्य फोडून भाजपच्या बाजूला वळविण्यात यश मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एकत्र असल्याचे सांगत अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवली. मात्र, जिल्हा परिषद सत्तेच्या राजकारणात राष्ट्रवादीचा गेम कोणी केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT