Shambhuraj Desai Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shambhuraj Desai News : शंभूराज देसाईंच्या गाडीवर बाटली फेकली ; पोवई नाक्याला छावणीचे स्वरुप..

Amol Sutar

Shambhuraj Desai News : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गाडीवर पोवई नाका येथे बाटली फेकल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेने पोलिसांची मात्र तारांबळ उडाली. शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागासह शंभरहून अधिक पोलिस गोळा झाल्याने पोवईनाका परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

साताऱ्यातील (Satara) गर्दीचे ठिकाण असलेल्या पोवई नाका येथे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांचे निवासस्थान आहे. आज सायंकाळचे सुमारास पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयातुन जात असताना एकाचा पोवईनाक्यावर असलेल्या शेंगदाणे-फुटाण्याच्या गाडीवर एकाचा वाद सुरू होतो. विक्रेत्याला तो शेंगदाणे-फुटाणे मागत होता. परंतु, तो त्याला देत नव्हता. त्यावरून दोघांची हमरीतुमरी सुरू होती.

या वेळी संबंधीत व्यक्तीला राग अनावर झाला. त्याने हातात असलेली पाण्याची बाटली हवेत भिरकावून दिली. संबंधिताने कोण येतेय, कोण जातेय हे न पाहता ती बाटली भिरकावली होती. परंतु, ती नेमकी वाहनांच्या ताफ्यातून घराकडे निघालेल्या पालकमंत्र्यांच्या गाडीवर पडली त्यामुळे खाडकन आवाज झाला. काही वेळा करीता ताफा थांबला.

पोलिसांनी तातडीने त्यांचा ताफा पुढे घराकडे पाठवून बाटली फेकणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला. या घटनेत पालकमंत्री देसाई यांना कोणतीही इजा झाली नाही. दरम्यान, दोन वर्षापूर्वी पालकमंत्री देसाई यांच्यावर वॉच ठेवला जात असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर महिन्यापूर्वी त्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न झाला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे पालकमंत्र्यांचा विषय म्हणजे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसते. तीच परिस्थिती काही काळ आज साताऱ्यात झाली. अधिकारी व कर्मचारी पोवईनाक्यावर गोळा झाले. कोणी हल्ला केला नाही ना या शंकेने चौकशी सुरू झाली. परंतु, शेंगदाणे-फुटाणे विक्रेत्यांशी चर्चा केल्यावर पोलिसांच्या जिवात जिव आला.

बाटली फेकणारा माथेफिरू होता हे त्याच्या चर्चेतून समोर आले. शेंगदाणे दिले नाहीत म्हणून त्याने मागे पुढे न पाहता बाटली भिरकावली होती हे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सिसिटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यातून एकाने बाटली भिरकावल्याचे समोर आले. परंतु, त्याची ओळख पटली नव्हती. सिसिटीव्ही फुटेज व विक्रेत्याकडून संबंधीताचे वर्णन घेऊन शोध सुरू केला.

परंतु, या दरम्यान पोवईनाक्यावर पोलिसांची मोठी गर्दी झाली होती. पोलिस उपअधिक्षक, पोलिस निरीक्षकांसह अनेक अधिकारी व कर्मचारी पोवईनाक्यावर गोळा झाले होते. त्यामुळे काय झाले याची चर्चा संपूर्ण शहरात सुरू झाली होती.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT