Solapur, 19 January : सांगोला सहकारी साखर कारखान्याची तारण ठेवलेली साखर परस्पर विक्री केल्याप्रकरणी कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह २३ संचालकांविरुद्ध सोलापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखान्याचे अध्यक्ष साळुंखे, उपाध्यक्ष आणि संचालकांनी संगनमत करून बॅंकेकडे तारण ठेवलेली ११ कोटी ४४ लाख ७६ हजार रुपयांची साखर विक्री केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील साखर कारखाना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ लागल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या (Solapur DCC Bank) सांगोला शाखेचे बॅंक इन्सपेक्टर अरविंद श्रीमंत काळेल यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सांगोला सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दीपक साळुंखे, माजी उपाध्यक्ष विश्वनाथ चव्हाण, संचालक सुभाष जाधव, अशोक शिंदे, शहाजी नलवडे, संचालक तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, वसंत जरे, राजेंद्र देशमुख, सदाशिव साळुंखे, मारुती बनकर, शिवाजी व्हनमाने, दादासाहेब देवकते, सदाशिव नवले, गुलाबराव पटेल, मच्छिंद्र खरात, उल्लास ढेरे, मारुती ढाळे, काकासाहेब व्होवाळ, सुवर्णा जाधव, सुनंदा तरंगे, सागर पाटील, भिकाजी बाबर, कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बॅंक इन्सपेक्टर काळेल यांच्या फिर्यादीनुसार, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 19 नोव्हेंबर 2011 रोजी वाकी शिवणे (ता. सांगोला) येथील सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्यास (Sangola Sugar Factory) मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची 50 कोटी रुपयांची कर्ज मर्यादा मंजूर केली होती. त्या वेळी कारखान्याची मालमत्ता तारण म्हणून बॅंकेकडे ठेवली होती.
संबंधित कराराप्रमाणे कारखान्यातून उत्पादीत केलेली साखर संस्थेच्या गोदामध्ये ठेवून ती बँकेच्या ताब्यात द्यावयाची होती. ज्या वेळी साखरविक्री करावयाची आहे, त्यावेळी बँकेकडून उचल केलेली रक्कम, त्यावरील व्याज व खर्च अशी संपूर्ण रक्कम बँकेकडे भरणा करून साखर पोती खरेदीदारास द्यावयाची होती. मात्र, बँकेच्या परस्पर साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी तारण साखरेची 31 जानेवारी 2013 पर्यंत तब्बल 11 कोटी 44 लाख 76 हजार इतक्या किंमतीची साखर विकली.
बॅंकेकडे तारण ठेवलेली साखर बॅंकेच्या परस्पर विक्री करून बँकेचा विश्वासघात आणि फसवणूक करण्यात आली आहे. त्यानुसार सांगोला सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष दीपक साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा तत्कालीन संचालक चेतनसिंह केदार यांच्या २३ संचालकांवर गुन्हा दखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २३ संचालकांपैकी दोन संचालकांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.