Vitthal Sugar Factory-Abhijeet Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : शरद पवार गटाला सोलापूरमध्ये मोठा झटका; बड्या नेत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Abhijeet Patil In Trouble : ईडीच्या नोटिशीमुळे रोहित पवार अगोदरच चौकशीची फेऱ्यात अडकलेले असताना अभिजित पाटील यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Vijaykumar Dudhale

Pandharpur News : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि २० संचालकांवर राज्य सहकारी बॅंकेच्या (शिखर) तक्रारीनंतर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सोलापूरमध्ये मोठा धक्का मानला जात आहे. ईडीच्या नोटिशीमुळे रोहित पवार अगोदरच चौकशीची फेऱ्यात अडकलेले असताना अभिजित पाटील यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Case has been registered in Pandharpur against Abhijeet Patil and 20 directors)

दरम्यान, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्यासह २० संचालकांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सहकारी बॅंकेची थकबाकी आणि दाखल झालेला गुन्हा यातून पाटील हे कसा मार्ग काढतात, हे पाहावे लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण ४३० काेटी रुपये थकवल्याप्रकरणी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात १२ जानेवारी रोजी तक्रार दिली होती. त्यानुसार विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि २० संचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला इथेनॉल आणि सहवीजनिर्मितीसाठी कर्ज मंजूर करून उचल दिलेली आहे. वेळोवेळी सूचना करूनही विठ्ठल सहकारी साखर कारखाना प्रशासनाने बॅंकेची कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज भरलेले नाही. त्यामुळे कारखान्याचे हे खाते ‘एनपीए’मध्ये निघाले आहे. बॅंकेने कारखान्याला २३ सप्टेंबर २०१९ रोजी नोटीस दिली हेाती. मात्र, कारखान्याने कर्ज न भरल्याने ३१ डिसेंबर २०२३ अखेर २५२.४९ कोटी मुद्दल आणि त्यावरील व्याज १७७.६८ कोटी रुपये इतकी थकबाकी आहे.

कारखान्याने साखर विक्री करण्यापूर्वी प्रतिक्विंटल ८०० रुपये कर्जखात्यात भरणे बंधनकारक होते. कारखान्याने २०२२-२३ या हंगामात ६६४४२० क्विंटल साखर उत्पादन केली आहे. प्रतिक्विंटल ८०० रुपयांप्रमाणे ५३.५१ कोटी रुपये बॅंकेत भरणे आवश्यक होते. तसेच, कारखान्याने उत्पादीत केलेली वीज आणि इथेनॉलही बॅंकेच्या परवानगीशिवाय परस्पर विक्री केले आहे. मात्र, बॅंकेच्या खात्यात कोणत्याही रकमेचा भरणा करण्यात आलेला नाही.

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि त्यांच्या संचालकांना बॅंकेशी झालेल्या कराराची संपूर्ण माहिती आहे. कारखान्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या निर्णयास सर्व संचालक जबाबदार असतात. त्यामुळे कारखान्याची उत्पादने राज्य सहकारी बॅंकेच्या परवानगीशिवाय विक्री करून फसवणूक केली आहे. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील अणि २० संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अभिजित पाटील हे सोलापूरच्या ग्रामीण भागातील मुख्य चेहरा आहेत. मात्र, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने पवारांचा सोलापूरमधील गट अडचणीत सापडला आहे. अध्यक्ष आणि संचालक मंडळास अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT