Sushilkumar Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : ‘वक्फ बोर्ड’ दुरुस्तीचा अधिकार केंद्राला; बाकीच्यांनी त्यावर बोलू नये; शिंदेंनी सुनावले

विश्वभूषण लिमये

Solapur News : वक्फ बोर्डचा कायदा हा संसदेने पारित केला आहे, त्यात दुरुस्ती करण्याचा अधिकार हा संसदेला आहे, त्यामुळे त्याबाबत इतरांना बोलण्याचा अधिकार नाही. कोणी काहीही, कसंही बोलतं, त्यांच्या तोंडाला कोण हात लावणार, असा सवाल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. (Center empowered to amend Wakf Board Act; Others should not talk about it : Shinde)

सोलापुरात शनिवारी (ता. 6 जानेवारी) हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चात आमदार नीतेश राणे आणि तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजासिंह सहभागी झाले होते. त्यात मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना वक्फ बोर्डाचा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली होती. विशेषतः टी राजा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तसे आवाहन केले आहे. त्यावर बोलताना माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी तो कायदा रद्द करण्याचा अधिकार केवळ संसदेला आहे, असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हिंदू जनआक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या दगडफेकीवरही सुशीलकुमार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शांततामय सोलापूरमध्ये आशा घटना घडणे योग्य नाही. सोलापूरच्या शांततेला गालबोट लावणे अयोग्य आहे. हा सर्व प्रकार कोणी केला, याबाबत पोलिस तपास करतीलच. पण, धर्म आणि जातीवर कोणी तेढ निर्माण करत असेल तर त्याचा मी निषेध करतो, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.

आमदार टी. राजासिंह यांनी शरद मोहोळ या नामचिन गुंडाची भलामण केली होती. त्यावर बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, गुंडप्रवृत्तीच्या माणसाचे समर्थन होता कामा नये. धार्मिक वृत्ती वाढवता वाढवता ती अधार्मिकतेकडे जाण्याची वृत्ती होतेय का, ती तपासली पाहिजे. त्यामुळे सर्वधर्मसमभाव महत्त्वाचा आहे, हे लोकांना कळलं पाहिजे.

दरम्यान,अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या मंदिरात येत्या 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये घडलेल्या घटनेप्रमाणे कृत्य घडता कामा नये, अशी अपेक्षाही सुशीलकुमार शिंदे यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT