Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti : राजू शेट्टी आक्रमक : स्वाभिमानीचे उद्या राज्यात चक्का जाम आंदोलन

विश्वभूषण लिमये

सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून (Swabhimani setkari Sanghatna) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात उद्या राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. बारावीच्या परिक्षामुळे ते आंदोलन दुपारी १२ वाजता करण्यात येईल. पोलिसांनी आंदोलन करू दिलं नाही, तर जशाच तसं उत्तर दिलं जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख, माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. (Chakka Jam Movement of Swabhimani setkari Sanghatna tomorrow in the state)

शेतकऱ्यांचे विजेचे बिल दुरुस्त करून द्यावे, विज वितरण कार्यालयाने शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवावी यासह वेगवेगळ्या प्रश्नांवर हे आंदोलन होणार आहे. वीज दरामध्ये करण्यात येणारी ३७ टक्के दरवाढ आम्हाला मान्य नाही. फक्त पाच जिल्ह्यांमध्ये दिवसा वीज दिली आहे, ती संपूर्ण महाराष्ट्रात द्यावी, अशी मागणीही शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शेट्टी म्हणाले की, रात्री वीज दिल्यामुळे जंगली जनावरे आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होतो, त्यात शेतकऱ्यांचा बळी जातो. शेतकऱ्याने वापरलेली वीज, यातील ५० टक्केच शेतकरी वापरतात, बाकीच्या चोऱ्या आणि लॉसेस शेतकऱ्यांच्या नावाने हॉर्स पावरच्या नावाखाली खपवतात. सोलापूरसह सातारा, कराड, खटाव, फलटण या प्रमुख ठिकाणी चक्का जाम करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा यासह अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन होणार आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळालेले नाही. पिक विमा देत असताना विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. सूरत-चेन्नई राष्ट्रीय महत्वकांक्षी महामार्ग होणार आहे. पण, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून, त्यांना किती मोबदला द्यावा लागणार याची माहिती दिली गेली नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने मोजणे, त्यावर हद्दी फिक्स करणे, अशा पद्धतीचे काम महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने होत आहे. ते काम आम्ही बंद पाडले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर सूरत चेन्नई राष्ट्रीय महत्वकांक्षी महामार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणीही माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT