Chandgad Here Saranjam land issue resolved after 40 years sparks political credit war. Shivajirao Patil, Bharamu Patil and Rajesh Patil react. Sa
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरातील 35 वर्षांचा प्रश्न झटक्यात निकाली; 22 हजार कुटुंबांना लाभ : बावनकुळेंच्या घोषणेनंतर भाजप-राष्ट्रवादीत 'श्रेयवाद'

Chandgad Here Saranjam Land : भाजपचे नेते आमदार शिवाजीराव पाटील यांनी वारंवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर महसूल मंत्री यांनी विधानसभेत हा प्रश्न निकाली लागल्याची घोषणा केली. मात्र त्यावरून आता चंदगडमध्ये श्रेयाचा राजकारण सुरू झाला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : चंदगड विधानसभा मतदारसंघातील तब्बल ३५ ते ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला हेरे सरंजाम जमिनीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. यावरूनच आता श्रेयवादाला सुरुवात झाली आहे. शासनाच्या निर्णयानंतर माजी आमदार राजेश पाटील यांच्या समर्थकांकडून या निर्णयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू होताच भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भरमू अण्णा पाटील यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

भरमू अण्णा पाटील यांनी नाव न घेता राजेश पाटील यांच्यावर निशाणा साधताना, "घरात कित्येक वर्षे आमदारकी होती, तरीही हेरे सरंजाम जमिनीचा प्रश्न सोडवता आला नाही. आता दुसऱ्यांनी प्रश्न मार्गी लावल्यानंतर फुकटचे श्रेय घेऊ नका," असा इशारा दिला. तसेच, "ज्यांनी हे काम प्रत्यक्षात करून दाखवले, त्यांचे कौतुक करण्याचे धाडस दाखवा," असेही ते म्हणाले.

३५ वर्षांचा प्रश्न अखेर निकाली

चंदगड विधानसभा मतदारसंघातील ५५ गावांतील हेरे सरंजाम इनाम जमिनीचा प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित होता. या जमिनी कसत असूनही हजारो शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना महसूल नोंदी, कर्ज, वारसा आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे. शासनाच्या निर्णयानुसार सुमारे २२ हजार कुटुंबांना शेतीच्या मालकीचा हक्क मिळणार असून १२ हजार ५०० हेक्टरहून अधिक जमीन प्रत्यक्ष कुळांच्या नावावर होणार आहे. तसेच ५४ लाख रुपयांचा नजराणा पूर्णपणे माफ करण्यात आला असून कागदपत्रांतील अनेक जाचक अटीही हटविण्यात आल्या आहेत.

'सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच प्रश्न सुटला'

भरमू अण्णा पाटील यांनी सांगितले की, आमदार शिवाजी पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतरच शासनाने निर्णय घेत हा प्रश्न निकाली काढला.

"केवळ पत्र देऊन प्रश्न सुटत नाही. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला," असे भरमू अण्णा पाटील यांनी सांगितले.

चंदगडमध्ये श्रेयवादाला सुरुवात

दरम्यान, शासन निर्णय जाहीर होताच चंदगडमध्ये या कामाचे श्रेय कोणाचे, यावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे राजेश पाटील समर्थक या निर्णयात त्यांच्या पाठपुराव्याचा वाटा असल्याचा दावा करत आहेत, lj दुसरीकडे भाजपकडून हा निर्णय पूर्णपणे महायुती सरकार आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रयत्नांचे फलित असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात हेरे सरंजाम प्रश्नावरून चंदगडमधील श्रेयवाद आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT