Chandrakant Gudewar-Devendra Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : विधानसभा निवडणुकीतून माघार घेतलेले चंद्रकांत गुडेवार देवेंद्र कोठेंसोबत फडणवीसांना भेटले

Solapur City Central Constituency : चंद्रकांत गुडेवार यांनी दोन दिवसांपूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेत देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन आपल्या समाज बांधवांना (पद्मशाली समाज) केले आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कोठे यांचा दावा मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 22 September : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणारे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी विधानसभेच्या मैदानातून माघार घेत माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

विशेष म्हणजे गुडेवार यांनी देवेंद्र कोठे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील पद्मशाली समाजाच्या बैठकीलाही हजेरी लावली आहे, त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीचा दावा अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार (Chandrakant Gudewar) यांनी महिनाभरापूर्वी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून (Solapur City Central Constituency ) निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसा मेसेजही त्यांनी पाठविला होता. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही ‘आय विल ट्राय’ असा प्रतिसाद दिला होता. त्यामुळे गुडेवार हे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी चर्चा रंगली होती.

चंद्रकांत गुडेवार यांनी सोलापूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. आयुक्तपदाच्या काळात केलेल्या कामामुळे ते सोलापूरमधील जनतेच्या मनात अजूनही कायम आहेत. गुड्डेवार यांच्यासारखा कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी लोकसेवक बनत असेल, तर त्याचे स्वागत करण्याची तयारीही सोलापूरकरांनी दर्शवली होती.

चंद्रकांत गुडेवार यांनी दोन दिवसांपूर्वीच विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेत देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन आपल्या समाज बांधवांना (पद्मशाली समाज) केले आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कोठे यांचा दावा मजबूत झाल्याचे मानले जात आहे. गुडेवार यांच्या निर्णयाबद्दल देवेंद्र कोठे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचे आभार मानले आहेत.

मोठी माणसं केवळ वयानं नाही, तर त्यांच्या अनुभवांतून, विचारांतून आणि कृतीतूनही मोठी बनतात, याची प्रचिती पुन्हा एकदा माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या निर्णयातून आली आहे. गुडेवारांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय मागे घेत त्यांनी शहर मध्य मतदारसंघासाठी माझ्या नावाला पाठिंबा दिला. इतकचं नाही तर इतरांनाही माझ्या नावाची शिफारस करावी, असे आवाहन केलं आहे, असेही कोठे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, राज्यातील पद्मशाली समाजाच्या प्रमुख प्रतिनिधींच्या बैठकीलाही गुडेवार यांनी सागर बंगल्यावर हजेरी लावली. सुतापासून बनवलेल्या हारावर देवेंद्रजी फडणवीस यांचा प्रतिमा असलेला हार माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार, ॲड रामदास सब्बन यांच्या हस्ते घालून फडणवीसांचा सत्कार करण्यात आला. सोलापुरातील यंत्रमागावर विणलेली चादर भेट देण्यात आली.

एकंदरीतच, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून गुडेवार यांनी माघार घेत पाठिंबा दिल्याने माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांची दावेदारी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. पण युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेलेला आहे. आता महायुतीमध्ये तो कोणाच्या वाट्याला जातो, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT