Chandrakant Patil Jayant Patil .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli MLC Politics: मुलाच्या उमेदवारीची चर्चा असतानाच सांगलीत चंद्रकांतदादांचा जयंत पाटलांना धक्का; दोन नगरसेवक फोडले?

Jayant Patil Vs Chandrakant Patil: सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूने करून आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आणली आहे

Rahul Gadkar

Sangli Political News: सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची घोषणा सोमवारी झाली. घोषणेनंतर या मतदारसंघातून माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली. असे असताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार जयंत पाटील यांचे सांगली जिल्हा परिषदेतील उट्टे काढण्यास सुरवात केली आहे.

सांगली महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवकांना रातोरात चर्चा करून फोडले आहेत. आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत सायंकाळी सात वाजता पक्षप्रवेश होणार आहे.

सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बाजूने करून आमदार जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता आणली आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जयंत पाटील यांनी शह दिल्याची चर्चा होती.

सध्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अशातच महाविकास आघाडीकडून प्रतीक पाटील यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना चांगलाच धक्का दिल्याचे समजते.

सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे गटनेते युवराज शिवाजीराव गायकवाड, नगरसेवक सुरेश लक्ष्मण बंडगर हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. सोमवारी रात्री उशिरा या दोन नगरसेवकांनी पुणे येथे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांची भेट घेतली. तर मंगळवारी सायंकाळी सात वाजता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजप पक्ष प्रवेश असल्याचे सांगितले जाते.

याबाबतची माहिती खात्रीलायक सूत्राने सरकारनामाकडे दिली आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकूण तीन नगरसेवक आहेत. या तीन नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक भाजपकडे जात असल्याने जयंत पाटील यांना हा धक्का समजला जातो.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सोमवारी चर्चा केली. त्यावेळी जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम देखील उपस्थित होते. रात्री उशिरा याबाबत पुणे येथे खलबत्ते झाल्यानंतर आज मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

याची कुणकुण आमदार जयंत पाटील यांच्या गटाला समजताच त्यांनी दोन्ही नगरसेवकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो संपर्क होऊ शकला नाही. कोणत्याही परिस्थितीत हे दोन नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सोडणार नाहीत असा दावा केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT