

Buldhana News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे एका कार्यक्रमात पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी देशवासियांना केलेल्या आवाहनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये या आवाहनावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. याचदरम्यान,माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित मोठी मागणी केली आहे.
आपल्या आक्रमक आणि वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे माजी महसूल राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून देशहितासाठी कठोर निर्णय घेण्याबाबतचं आवाहन केलं आहे.सावजी यांनी पत्रात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर देशावर मोठं आर्थिक संकट ओढवलं असल्याचं म्हटलं आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी देशातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचं मानधन एका वर्षासाठी गोठवण्यात यावं,अशी मोठी मागणी केली आहे. या मागणीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सावजी यांच्या पत्रानंतर मोदी सरकार खरोखर देशातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींचं मानधन एका वर्षासाठी गोठवणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पत्रात आर्थिक परिस्थितीवर महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे. ते म्हणाले, देशावर ओढावलेल्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि भारत सरकारच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं असल्याचंही सावजी पत्रात नमूद करतात.
सुबोध सावजी यांनी पत्रात आपण महाराष्ट्रातून एक माजी लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केल्याचं म्हटलं आहे. तसेच देशावर संकट असताना केवळ इतरांना सल्ला न देता,मानधन गोठवण्याबाबतची सुरूवात स्वतःपासून करण्यास तयार असल्याचंही स्पष्ट केलं.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असलेले माजी मंत्री सुबोध सावजी यांनी काँग्रेस पक्षाशी संबंधित राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या जबाबदार्या सांभाळल्या आहेत.याच धर्तीवर आता पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसह देशातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचे मानधन गोठवताना,त्यांनी त्यांचंही मानधन एका वर्षाकरिता गोठवण्यात यावं,ही प्रांजळ इच्छा व्यक्त केली आहे
सुबोध सावजी यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात संतप्त प्रतिक्रिया देऊन नवा वाद ओढवून घेतला होता. अत्याचाराच्या प्रकरणांवरून थेट राज्यपालांना पत्र पाठवले असून, त्यात त्यांनी वादग्रस्त मागण्या केल्या होत्या.
अशोक खरात प्रकरणात स्वतःहून अत्याचार करून घेणाऱ्या महिलांवर पोलीस केसेस दाखल कराव्यात आणि त्यांची नावे,फोटो व व्हिडिओ चित्रिकरण शासनाने समाजासमोर आणावे,असे विधान सावजी यांनी केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच सुबोध सावजी यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधातही आक्रमक शैलीत टीका करताना थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळात ईव्हीएम (EVM) घोटाळा झाल्यास मुख्य निवडणूक आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी सावजी यांनी दिली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जाहीर सभेत पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी देशवासीयांना ७ महत्त्वाची आवाहने केली होते. त्यात सोने खरेदी टाळा, इंधन बचत, वर्क फ्रॉम होम, सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूल वापर, परदेशी प्रवास रद्द टाळा, खाद्यतेलाचा कमी वापर,स्थानिक उत्पादनांना प्राधान्य, नैसर्गिक शेती यांचा समावेश होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.