Solapur, 18 October : बार्शीचे राजेंद्र राऊत हा चांगला माणूस मला आमदार विधानभवनात पाहिजे, असा नवस मी यापूर्वी बार्शीला आल्यानंतर भगवंताकडे केला होता. आज पेढे वाटून तो नवस पूर्ण केला. पण पुन्हा एक नवस बोललो आहे की, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार 50 टक्क्यांचा कोटा घेऊन विजयी होऊ दे, मी पुन्हा तुझ्याकडे येतो आणि नवस फेडतो, असे साकडे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बार्शीच्या भगवंताला घातले आहे.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बार्शीत कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भगवंताला केलेल्या नवसाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, जेव्हा जेव्हा मला काय हवं असतं. तेव्हा मी बार्शीच्या भगवंताला नवस करतो. विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत राजेंद्र राऊत पराभूत झाले. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनात ‘एक चांगला माणूस पडला,’ अशी सल होती. त्यांनी त्यांचे प्रयत्न केले.
आम्ही देव मानणारे आहोत, त्यामुळे बार्शीला आल्यानंतर भगवंताकडे पुन्हा प्रार्थना केली. राजेंद्र राऊत हा माणूस मला विधानभवनात पाहिजे. त्यामुळे आज पेढे नेऊन भगवंताला केलेला नवस फेडला. आज पुन्हा भगवंताला नवस केला. पुणे पदवीधरमधील दोन्ही उमेदवार 50 टक्क्यांचा कोटा घेऊन विजयी होऊ दे, मी पुन्हा तुझ्याकडे येतो आणि नवस फेडतो, असे साकडे भगवंताला घातले आहे, असे पाटील यांनी नमूद केले.
ते म्हणाले, माजी मंत्री प्रकाश जावडेकर हे पुणे पदवीधर मतदारसंघातून फक्त 80 मतांनी निवडून आले होते आणि 2008 ला मी 8 हजार मतांनी निवडून आलो. 2008 मध्ये विलासराव पाटील वाठारकार यांचा मुलगा माझ्या विरोधात उभा राहिला त्याला शरद पवार मानसपुत्र मानायचे. 2014 ला पुन्हा श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील हे शरद पवारांचे मानसपुत्र उभे राहिले ते पुन्हा माझ्यासमोर हरले.
पदवीधर मतदारसंघामध्ये 3 लाख 88 हजारमधील फक्त 20 टक्के मतदान होते. मात्र, येत्या 23 ला मोठ्या प्रमाणात मतदान करा आणि 27 ला ती कोणाला मिळतील, हे आपण बघू. 80 टक्के मतदान करा आणि ते जास्तीत जास्त भाजप उमेदवाराला झाले पाहिजे. मतं बाद होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करा. ही कागदावर पेनाने मतदान करण्याची निवडणूक आहे. ब्ल्यू रंगाचा मार्कर दिला जातो, त्यानेच मतदान करा, तुमच्या पेनाने केलेले मत बाद होते.
आपल्या उमेदवारांचे नाव दोन नंबरला आहे, तिथे चिन्ह नसते. एका वृद्ध महिलेने मला सांगितलं की, तुम्ही नरेंद्र मोदींना भेटत असाल तर तुमचं चिन्ह कमळ चिन्ह बदलून मोदी करा. कारण आम्ही मतदान करायला गेलो तर मोदी दिसतच नाही. गुप्त मतदानात मतदार उमेदवाराला सिग्नल देण्याचा प्रयत्न केला तर मत बाद होते एक ठिपकाही चालत नाही. दर निवडणुकीत 10 हजार मतं बाद होतात, असेही चंद्रकांतदादांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.