Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Self Immolation Incident : अशा घटनांमुळे सोलापूरला नेते येण्याचे प्रमाण कमी होईल; चंद्रकांतदादांनी व्यक्त केली भीती

विश्वभूषण लिमये

Solapur News : माझी भेट न मिळाल्याने एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी कळाली. त्या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढच्या वेळी त्या तरुणाला मी भेटन. पण, शाहीफेक, पेटवून घ्या, अशा पद्धतीची आंदोलने लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही. अशाने सोलापूरमध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या येण्याचे प्रमाण कमी होईल, अशी भीती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. (Chandrakant Patil's reaction to the youth's self-immolation incident)

माढा तालुक्यातील दादा कळसाईत या तरुणाने व्यायाम शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी होत नसल्याने आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चंद्रकांत पाटील म्हणाले की, नियोजन समितीची बैठक आणि नाट्य संमेलनाचे कार्यालयाचे उदघाटन आज सकाळपासून सोलापुरात पार पडले. अचानक एका तरुण आंदोलकाने माझी भेट न मिळाल्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी मला कळाली, असा कोणताही विषय माझ्यासमोर आला नाही. आता पत्रकारांनी मला माहिती दिली, त्या प्रकरणात मी तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. आता मला पुण्याला निघायचं आहे, त्यामुळे पुढील दौऱ्यात त्या तरुणाला किंवा प्रतिनिधीला मी भेटेन.

अशा प्रकारच्या आंदोलनामुळे सोलापूरमध्ये राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या येण्याचे प्रमाण कमी होईल. प्रत्येकाला आंदोलनाचे, अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे, पण, असे आंदोलन करणे योग्य नाही. त्यामुळे स्वतःचे नुकसान आपण करतोय, समाजात यामुळे दहशत निर्माण होते. धरणे, उपोषण असे आंदोलन करता येईल. वेळप्रसंगी घेराव ही घालता येईल. पण शाहीफेक, पेटवून घेणे, अशा पद्धतीचे आंदोलन लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही

काय घडले होते

टाकळी टेंभुर्णी (ता. माढा) येथील व्यायाम शाळेतील भ्रष्टाचाराची तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने दादा कळसाईत या तरूणाने आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. एका हातात पेटवलेला टेंभा आणि दुसऱ्या हातात पेट्रोलचे कॅन होते. तो कॅनमधील पेट्रोल अंगावर ओतून पेटवून घेण्याची धमकी देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले आणि पुढील अनर्थ टळला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT