Solapur News : सोलापूर जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या निधीपैकी आतापर्यंत केवळ 39 टक्केच निधी खर्च झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी उर्वरीत 61 टक्के निधी खर्च करावा लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाला कडक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसांत हा निधी 39 टक्क्यांवरून 80 टक्क्यांपर्यंत खर्च झालेला दिसेल. तसेच पुढील वर्षीचा विकास आराखडा हा 111 कोटींनी वाढून तो 855 कोटींचा असेल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापुरात सांगितले. (Next year's development plan of Solapur will increase to 111 crores: Chandrakant Patil)
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर होते. जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषदेत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सोलापूर जिल्हा नियोजन समितीची ही तिसरी बैठक होती. त्यात समितीच्या गेल्या वर्षभराच्या कामाचा आढावा घेण्यात आला आणि येत्या वर्षभरात काय करणार आहोत. तसेच, त्यासाठी राज्य सरकारकडे पैशाची मागणी करायची असते, त्याबाबत अंदाज घेण्यात आला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी आपल्याला हा निधी खर्च करावा लागणार आहे. नाही तर आचारसंहितेत तो आपल्याला वापरता येणार नाही. या वर्षी आपण केवळ 38.75 टक्के निधी खर्च करू शकलो आहोत. राज्यातील सर्वच जिल्ह्यांची ही परिस्थिती आहे. पण, जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत उर्वरीत निधी खर्च करण्यात यावा, यासाठी प्रशासनाला आम्ही कडक सूचना दिल्या आहेत. येत्या आठ दिवसांत हा निधी चाळीस टक्क्यांवरून 80 टक्क्यांवर जाईल, एवढ्या कामांची अंदाजपत्रकं आली आहेत. त्याला मंजुरी देण्याचे काम सुरू आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
पुढील वर्षीच्या विकास आराखड्यासाठी आम्ही राज्य सरकारकडे सुमारे 111 कोटी रुपये जास्त मागतो आहोत. काही योजनांना वाढीव निधी मिळाला तरच न्याय देता येईल, अशी परिस्थिती आहे. नाही तर कुणालाही न्याय देता येणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीचा सोलापूरचा विकास आराखडा हा 855 कोटी 28 लाखांचा तयार करण्यात आला आहे. हा निधी आम्हाला राज्य सरकारकडून मिळेल, अशी मला आशा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्या शीर्षकांना निधी कमी पडतो, अशा शीर्षकांना हा वाढीव निधी आपल्याला खर्च करता येईल. गड्डा यात्रेमुळे सिद्धेश्वर मंदिरासमोरील रस्ता वक्फ बोर्डाने अडवला होता. पण आम्ही त्यांच्याकडून ना हकरत मिळविली आहे. त्या रस्त्याच्या कामासाठी महापलिकेला नियोजन समितीकडे प्रस्ताव देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी रस्त्याच्या कामासाठी दीड कोटींचा प्रस्ताव दिला आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पीटल) सीटी स्कॅन मशीन बंद आहे. नवीन मशिन घेण्यासाठी 12 कोटी लागणार आहे. आम्ही राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवूनही त्यावर काही झालेले नाही. आम्ही अजून एक महिना राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. राज्य सरकारकडून पैसे आले नाही तर आम्ही नियोजन समितीतून पैसे देणार आहोत.
उजनी ते सोलापूर जलवाहिनीचा विषयही पालिका आयुक्तांनी मांंडला. प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, महावितरण आणि रोजगार हमी योजना यासंदर्भात चार आढावा बैठक घेणार आहे. अधिकाऱ्यांनी पूर्व तयारी करून येण्यासाठी सांगितले आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
Edited By-Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.