Solapur, 02 February : सोलापूर महापालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाने आमदार देवेंद्र कोठे यांचे भाऊजी विनायक कोंड्याल यांना, तर उमहापौरपदासाठी ज्ञानेश्वरी महेश देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून भाजपचा बहुताचा आकडा पाहता या दोघांच्या घोषणेची औपचारिकता तेवढी बाकी आहे. महापौरपद आपल्या गोटाकडे खेचून घेत आमदार कोठे यांनी दोन्ही देशमुखांना पहिल्याच टर्ममध्ये चेकमेट केल्याचे मानले जात आहे.
सोलापूर (Solapur) महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत १०२ जागांपैकी ८७ जागा जिंकल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख आणि देवेंद्र कोठे यांनी पक्षाला मोठे यश मिळवून दिले आहे. आतापर्यंतचे भाजपचे हे सर्वांत मोठे यश मानले जाते.
बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपकडून महापौरपदासाठी (Mayor) कोणाला संधी दिली जाते, याकडे सोलापूरचे लक्ष होते. सोलापूरचे महापौरपद हे खुले झाल्याने या प्रवर्गातील नगरसेवकांच्या आकांक्षा घुमारे फुटले होते. महापौरपद हे खुले असून त्यासाठी आमदार कोठेंचे भावजी विनायक कोंड्याल, आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख, भाजपचे वरिष्ठ नगरसेवक नरेंद्र काळे आणि अनंत जाधव ही प्रमुख नावे चर्चेत होती.
भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आलेले नरेंद्र काळे यांना संधी मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांची गटनेतेपदी निवड करून महापौरपदाच्या शर्यतीतून एक मातब्बर मोहरा बाजूला करण्यात आला. त्यानंतर आज पक्षाकडून विनायक कोंड्याल यांचे नाव महापौरपदासाठी, तर ज्ञानेश्वरी देवकर यांना उमहापौरपदासाठी संधी देण्यात आली आहे.
महापौरपदाच्या निवडीत आमदार देवेंद्र कोठे यांनी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना चेकमेक करत बाजी मारली आहे. सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने ८७ जागा जिंकल्या असल्या तरी त्यातही दोन्ही देशमुख समर्थकांची संख्या लक्षणीय मानली जात होती. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी तिकिट दिलेले ४१ नगरसेवक निवडून आलेले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख गटाचे २५, तर सुभाष देशमुख समर्थक १७ नगरसेवक आहेत.
सोलापूर महापालिकेत दोन्ही देशमुखांच्या समर्थक नगरसेवकांची बेरीज हे कोठे समर्थकांपेक्षा जादा होती, तरीही कोठे यांंनी पालकमंत्री गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून बाजी मारल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे कोठेंचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क आहे, त्या आधारावर बाजी मारल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.