Chetan Narake Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chetan Narake : तयारी कोल्हापूरची, पण पेपर हातकणंगलेचा; नरकेंनी नाकारला ठाकरेंचा प्रस्ताव

Lok Sabha Election 2024 : मी अजून कोल्हापूरच्या रिंगणातून बाहेर पडलेलो नाही. मी 100 टक्के रिंगणात असणार

Rahul Gadkar

Kolhapur Political News : गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आणि महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाच्या प्रस्तावाला नकार दिला आहे. कोल्हापूर मतदारसंघ सर्वत्र पिंजून काढला असताना त्यांना हातकणंगलेतून उमेदवारीचा प्रस्ताव ठाकरेंनी दिला होता. मात्र, त्यांच्या या प्रस्तावाचा सन्मानपूर्वक नकार देत कोल्हापूरमधूनच अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत नरकेंनी दिले आहेत.

ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिलेल्या प्रस्तावानंतर नरकेंनी पत्रकार परिषदे घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कोल्हापूरची जागा शिवसेनेला गेली असती तर माझी उमेदवारी नक्की होती. मात्र, जागा काँग्रेसला गेली. मात्र, मी अजून कोल्हापूरच्या रिंगणातून बाहेर पडलेलो नाही. मी 100 टक्के रिंगणात असणार असे ठामपणे डॉ. नरकेंनी सांगितले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी हातकणंगलेचा पर्याय दिला. मात्र, खासदार राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क करून त्या प्रस्तावाला मी नकार दिला आहे. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही नरकेंनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची डॉ. चेतन नरके (Chetan Narke) यांनी भेट घेतली होती. या भेटीत नरके यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून उमेदवारी घ्यावी, असा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर नरके हे काय भूमिका घेणार याकडे लक्ष होते. दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून नरकेंनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू ठेवलेला आहे. ठाकरेंच्या प्रस्तावानंतर त्यांना पुन्हा हातकणंगलेतून नव्याने सुरुवात करावी लागणार. शिवाय प्रचारातून बेस मजबूत केला असताना हातकणंगलेतून निवडणुकीला उभे राहणे शक्य नसल्याचे डॉ. नरके यांचे मत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीत येत नसल्याने आता शिवसेना ठाकरे गटाने या ठिकाणी स्वतंत्र उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ठाकरे गटाने उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून, गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांच्यासमोर हातकणंगलेचा प्रस्ताव ठेवला होता. त्याबाबतची चर्चा डॉ. नरके यांच्यासोबत झाली होती.

नरके यांना मैदानात उतरवून पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातून त्यांचा जनसंपर्क असल्याने त्या ठिकाणाहून मताधिक्य मिळवण्याचे गणित होते. शिवाय शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बळ त्यांच्या पाठीमागे उभा करण्याचा बेत होता, तर हातकणंगले, शिरोळ आणि इचलकरंजीमधूनही माजी आमदार यांची ताकद नक्की त्यांना देण्याचा प्रयत्न होता. मात्र, वंचितवर अवलंबून असणाऱ्या ठाकरे गटाने याबाबत अद्याप निर्णय घेतला नव्हता. वंचित आता स्वतंत्र लढत असल्याने डॉ. नरके यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावाला नकार दिला आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांनी कोल्हापूर (Kolhapur) लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहेत. महाविकास आघाडीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबाबत चर्चा केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दोन वेळा चेतन नरके यांनी हजेरी लावली होती. आतापर्यंत त्यांनी लोकसभा मतदारसंघातील संपूर्ण दोन वेळा दौरा केला आहे. महाविकास आणि महायुतीपेक्षा सर्वात जास्त प्रचाराच्या आघाडीवर चेतन नरके आहेत. त्याचबरोबर मतदारसंघात फलक आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करत निवडणुकीची जय्यत तयारी सुरू ठेवली आहे. अशातच महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसला गेल्याने त्या ठिकाणी शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT