Chhagan Bhujbal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Obc Melava : मंत्री बंत्री मी नंतर अगोदर ओबीसी कार्यकर्ता; छगन भुजबळांचा पंढरीतून इशारा

Vijaykumar Dudhale

Pandharpur News : मी मंत्री बंत्री नंतर आहे, अगोदर माणूस आणि ओबीसी कार्यकर्ता आहे. आमदार, मंत्रिपद हे नंतर आले. ओबीसींना मंडल आयोग लागू करण्यात यावा, यासाठी मी शिवसेना सोडली आहे. त्यामुळे मला मंत्रिपद आणि खासदारकी, आमदारकीचं कौतुक, अप्रूप नाही, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला. (Chhagan Bhujbal entered Pandharpur for OBC Melava)

पंढरपुरात आज ओबीसींचा मेळावा होत आहे, त्या मेळाव्यासाठी मंत्री भुजबळ हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. पांडुरंगाच्या दर्शनानंतर ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये. देशात ५४ टक्के लोक ओबीसी आहेत, त्यांच्यासाठी मी काम करत आहे. मोर्चा, आंदोलने ही दोन्ही बाजूंनी थांबली पाहिजेत. ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे सरकार म्हणत असेल तर तुम्ही का आंदोलन करता. कशासाठी मुंबईला जा, इकडे जा करता, असा सवालही त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी देशपातळीवर समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींसाठी लढत आहे. दिल्लीत आम्ही रामलिला मैदानावर तीन लाख लोकांचा मेळावा घेतला होता. त्यानंतर पाटण्यातील मेळाव्याला सात लाख लोक उपस्थित होते. हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश या ठिकाणी सभा घेतल्या आहेत. ओबीसींसाठी मी आज काम करत नाही, तर गेल्या तीस वर्षांपासून हे काम करत आहे. नेता असा मानून होत नसतो. आपण काम करत राहायचं, असेही भुजबळ यांनी सांगितले.

भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रात वेगवेगळ्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत, त्या दूर व्हाव्यात आणि सर्वजण गुण्यागोविंदानी राहावेत, अशी मागणी पांडुरंगाच्या चरणी करणार आहे. जे लोक वादविवाद वाढवत आहेत, त्या सर्वांना सद्‌बुद्धी द्यावी, असे साकडेही विठ्ठलाला घालणार आहे.

एका बाजूने जालन्यात हा वाद पेटत गेला. मी काहीही, एक शब्दही बोललो नाही. मला शिवीगाळ करत राहिले, माझा अपमान करत राहिले. ज्यावेळी बीड पेटलं, आमदारांची घरं पेटवली, हॉटेल पेटवली. त्यानंतर मी दौरा केला आणि मला बोललं पाहिजे, असं वाटलं. त्यानंतर मी बोलायला सुरुवात केली. आम्ही काही कोणाकडे मागत नाही. पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये, असं माझं म्हणणं आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT