Kolhapur News : कोल्हापूरचा सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राचा ठेवा असणारा खासबाग मैदान आणि संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्षस्थानी पडल्यानंतर सर्व स्तरातून भावूक प्रतिक्रिया उमटत आहेत. कोल्हापूर वासियांपासून ते कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी आणि राजकीय लोकप्रतिनिधींकडूनही या घटनेबाबत शोक व्यक्त केला जात आहे.
आज कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. हे नाट्यगृह सर्वांचे आवडते, हे कोल्हापुरचे सांस्कृतिक केंद्र आहे. सर्वानुमते ही वास्तू पुन्हा बांधली पाहिजे. त्यासाठी सरकारने निधी दिला पाहिजे. आम्हाला जे नको होतं ते झालं, या आगीची चौकशी झाली पाहिजे. अशी प्रतिक्रिया शाहू महाराज छत्रपती यांनी दिली.
कोल्हापुरातील सांस्कृतिक जीवनात विशेष स्थान असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंडातील कोल्हापूरचा अभिमान असलेल्या खासबाग कुस्ती मैदानाच्या परिसरात उभारलेले हे नाट्यगृह, जे पूर्वी पॅलेस थिएटर म्हणून ओळखले जात असे, आता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह या नावाने प्रसिद्ध आहे.
दुर्दैवाने, गुरुवारी रात्री या नाट्यगृहाला लागलेल्या आगीमुळे रंगमंचापर्यंत ज्वाळा पसरल्याने थिएटर जवळपास नष्ट झाले आहे, हे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. यामुळे खासबाग कुस्ती मैदानाच्या स्टेजलाही आग लागली होती, ज्यामुळे दोन्ही ठिकाणांचे मोठे नुकसान झाले आहे. अशी खासदार शाहू छत्रपती (Shahu Maharaj Chhatrapati) यांनी दिली आहे.
'शुक्रवारी, 9 ऑगस्ट रोजी संगीतसूर्य केशवराव भोसले यांची जयंती असताना हा अपघात घडल्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. थिएटरची ही हानी सांस्कृतिकदृष्ट्या मोठी आहे, कारण या ठिकाणी अनेक महान कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण महापालिका आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तसेच कोल्हापूरच्या नागरिकांनी एकत्र येऊन आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत.'अशी प्रतिक्रिया एक्सवर पोस्ट केली आहे.
या ऐतिहासिक स्थळाचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेता, सरकारने या ठिकाणाची लवकरात लवकर पुनर्बांधणी करण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. 10 कोटी निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांनी जाहीर केला आहे, पण तो लवकर द्यावा व कामास सुरवात करावी, अशी मागणी ही शाहू छत्रपती यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.