Jaykumar Gore-Shivendraraje Bhosale-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivendra Raje : मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरेंना बॅटिंग करायला नव्हे; विकेट काढायला सोलापुरात पाठवलंय : शिवेंद्रराजेंची गुगली

Jaykumar Gore News : मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खुलासा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्यात राजकीय विकेट काढण्यासाठी विशेष नेमणूक केली आहे.

सरकारनामा ब्यूरो
  1. माळशिरसचे माजी आमदार (स्व.) श्यामराव पाटील यांचे कुटुंब भाजपमध्ये प्रवेशले, हा प्रवेश मोहिते पाटील यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

  2. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की ते सोलापूरमध्ये "विकेट काढायला" आले आहेत, आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना तीच जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, भाजपची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

  3. कार्यक्रमाला राज्यातील तीन मंत्री आणि अनेक नेते उपस्थित होते, ज्यांनी मोहिते पाटलांवर जोरदार टीका केली आणि भाजपमध्ये आलेल्या प्रकाश पाटील यांच्या स्वागतातून पक्षाच्या वाढत्या संघटनशक्तीचे प्रदर्शन केले.

Solapur, 08 November : पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात बॅटिंग करायला नाही, तर विकेट काढायला आलेले आहेत. त्यासाठी त्यांची खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमणूक केलेली आहे, त्यानुसार गोरेंनी नुकत्याच काही विकेट काढल्या आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला.

माळशिरसचे माजी आमदार (स्व.) श्यामराव पाटील यांचे पुत्र प्रकाश पाटील, स्नुषा श्रीलेखा पाटील व सर्व नातवांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्या प्रवेशाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale), ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, गोपीचंद पडळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते, राजन पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन केदार व इतर उपस्थित होते

माळशिरस तालुक्याचे माजी आमदार (कै.) श्यामराव पाटील यांचे घराणे मोहिते पाटील (Mohite Patil) यांचे कट्टर विरोधक म्हणून राज्यात ओळखले जाते. भाजपने (कै.) श्यामराव पाटील यांच्या कुटुंबीयांना भाजपमध्ये प्रवेश देऊन पक्षाने मोहिते पाटलांचा पत्ता कट केल्याचे मानले जाते. कार्यक्रमाला उपस्थित नेत्यांची भाषणेही तशीच झाली. अनेकांनी मोहिते पाटलांवर टीकास्त्र सोडले.

शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, काँग्रेसची प्रवृत्ती भिजत घोंगडे ठेवण्याची आहे. भाजप हा विकास करणारा पक्ष आहे. मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांमुळे मिळालेले आहे. ओबीसींचे आरक्षण कमी न करता सर्वांना न्याय दिला आहे. त्यामुळे येणारी विधानसभेची निवडणूक ही अकलूज नगरपरिषद जिंकूनच होणार आहे.

आमदारकी काय असते, हे रामभाऊ सातपुतेंमुळे माळशिरसमधील जनतेला कळाले आहे. येथील सत्ताधाऱ्यांनी पाण्याचा एक थेंबही आणि एमआयडीसी आणली नाही. सोलापूर जिल्ह्यातील ऑपरेशन लोटस थांबलेले नाही आणि थांबणारही नाही. मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही.आम्ही कुणाची जिरवायला आलो नाही, तर भाजप वाढवायला आलोय. राम सातपुते यांच्या पाठीशी मुख्यमंत्री ठामपणे आहेत. निवडणुकीचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात प्रकाश पाटील म्हणाले, आम्ही गेली ४० वर्षे काँग्रेसचे निष्ठेने काम केले आहे. ज्या पक्षाचे काम करू ते प्रामाणिकच करू. भाजपच्या माध्यमातून राज्यात व देशात विकास कामे सुरू आहेत. सुशिक्षित बेकरांचे प्रश्न जटील आहेत. तालुक्यात औद्योगिक वसाहतीची गरज आहे. विकासासोबत असले पाहिजे या भावनेने आम्ही भाजपमध्ये आलो आहोत.

माजी आमदार राम सातपुते म्हणाले, ‘प्रकाश पाटील यांचे घराणे लढवय्या घराणे आहे. विधानसभेपूर्वी प्रकाशबापू जर भाजपमध्ये आले असते तर आज मी माजी आमदार नसतो. तसेच, २००९ मध्ये दिलीप कांबळे यांना अवघी पाच हजार मते मिळाली होती. मोहिते पाटील, उत्तम जानकर हे दोन गट एकत्र असूनही मला एक लाख आठ हजार मते मिळाली आहेत. कारण या तालुक्यातील भाजपचा कार्यकर्ता कडवट आहे. येथील विकृत प्रस्थापित व्यवस्था हटवण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहोत . या प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक २२ गावांना पिढ्यानपिढ्या पाणी दिले नाही. ते सहा जिल्ह्यांना पाणी देण्यास निघाले आहेत.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, भाजपच राज्यांची उर्वरित कामे करू शकणार आहे. रेल्वेसाठी निधी आणलेला आहे. मोहिते पाटील यांची विश्वासार्हता संपलेली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, मोहिते पाटलांना १९७७ मध्ये पाणी पाजणारे घराणे आहे. प्रकाश पाटील यांच्या पक्षप्रवेशासाठी तीन मंत्री आलेले आहेत. यातून त्यांचे महत्व लक्षात येते.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, कै. शामराव पाटील व आमच्या घराण्याचा जुना स्नेह आहे. ‘जाणता राजा’ म्हणवून घेणाऱ्यांनी या भागात काही केलेले नाही. बारामतीत ५० टक्के दुष्काळी भाग आजही आहे. लोकसभा विधानसभेला चुका केल्या. चुका माफ करून नीरा देवघर धरणासाठी निधी दिलेला आहे. शेती महामंडळाची १८०० एकर जमीन एमआयडीसीसाठी मोफत दिली आहे. पाटील कुटुंबीय भाजपमध्ये आल्याने माझी बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाली आहे.

Q1. प्रकाश पाटील आणि त्यांचे कुटुंब कोणत्या पक्षात प्रवेशले?
A1. त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Q2. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला कोणते प्रमुख नेते उपस्थित होते?
A2. राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि गोपीचंद पडळकर आदी नेते उपस्थित होते.

Q3. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आपल्या भूमिकेबाबत काय म्हटले?
A3. त्यांनी सांगितले की ते जिल्ह्यात "बॅटिंग नव्हे तर विकेट काढायला" आले आहेत आणि भाजप मजबूत करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

Q4. या प्रवेशाचा राजकीय अर्थ काय लावला जात आहे?
A4. भाजपने माळशिरसमध्ये मोहिते पाटलांचा प्रभाव कमी करण्याची रणनीती आखल्याचे संकेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT