Pandharpur, 12 September : दोन दिवसांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्याच नगरसेवकांनी कॉरिडॉरच्या विषयाला स्थगिती दिल्याचा ठराव मंजूर केला. या ठरावामुळे कॉरिडॉरच्या कामाला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे राज्य सरकारने कॉरिडॉरच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहरातील नऊ विविध ऐतिहासिक मठ-मंदिरांचे जतन आणि संवर्धनासाठी 35 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.
ग्रामविकास आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही दोन दिवसांपूर्वी पंढरपूर कॉरिडॉर होणारच, असे सोशल मीडियातून जाहीर केले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉरिडॉरसाठी थेट निधीची तरतूद करत पंढरपूर कॉरिडॉर होणाच हे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पोस्टमुळे कॉरिडॉरचे काम लवकरच सुरू होईल, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. यापूर्वीच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉरचे काम होणारच, असे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्र्यांनीच कॉरिडॉरमध्ये बाधित होणाऱ्या 9 मठ-मंदिरांसाठी 35 कोटींचा निधी जाहीर केल्याने कॉरिडॉरच्या कामाला लवकरच गती मिळणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये ‘देवा भाऊ सरकार, पंढरीचा ऐतिहासिक वारसा जपणार आणि कॉरिडॉरला मिळणार साज, शेकडो वर्षांचा पंढरीचा इतिहास नव्या रूपात जपला जाणार’ असे नमूद केले आहे. पंढरपूरच्या प्रस्तावित कॉरिडॉरमध्ये येणाऱ्या वारसा आणि ऐतिहासिक स्थळांचा वारसा जपला जाणार आहे.
जी नऊ मंदिरे आणि वास्तूंचे जतन आणि संवर्धन केले जाणार आहे, त्यामध्ये श्रीराम मंदिर-होळकर वाडा(12 कोटी रूपये), द्वारकाधीश मंदिर - शिंदे सरकार वाडा(12 कोटी रुपये), मल्लिकार्जुन मंदिर(2 कोटी रुपये), ताकपीठे विठोबा मंदिर(2 कोटी रुपये), प्रल्हाद महाराज समाधी(50 लाख रुपये), देहूकर महाराज मठ(1कोटी 50 लाख रुपये), अकरा रुद्र मारुती मंदिर(1 कोटी रुपये), गोपाळ कृष्ण मंदिर(3 कोटी रुपये) आणि जैन मंदिर(2 कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
पंढरपूर नगरपालिकेने विरोध दर्शवला तरी सरकारी पातळीवर कॉरिडॉरच्या अनुषंगाने नियोजन सुरू असून, ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी निधी मंजूर झाल्याने कॉरिडॉरचे काम आता अटळ असल्याचे मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.