Solapur, 03 February : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुर्दैवाने बार्शीला येता आले नाही. मात्र, त्यांनी मला सांगितलंय. नगरपालिका आणि मार्केट कमिटीच्या निवडणुकीची बार्शीकरांची उधारी आहे. आता झेडपी-पंचायत समितीत उधारी करा, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस ही सर्व उधारी चुकती करण्यासाठी बार्शीला येणार आहेत, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
सोलापूर जिल्हा परिषद आणि बार्शी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत गोरे बोलत होते. गोरे यांनी बार्शीत विरोधकांवर जोरदार टीका केली. दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजप विरोधात बार्शीत झेडपी-पंचायत समितीत लढत आहेत. बार्शीतील शिवसेना (शिंदे-ठाकरे) राष्ट्रवादी (अजित पवार आणि शरद पवार) युतीला गोरेंनी लांडग्याची उपमा दिली. विरोधकांवर टीका करणाऱ्या गोरेंनी माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांचा धुरंधर म्हणून उल्लेख केला.
जयकुमार गोरे (Jaykumar Gore) म्हणाले, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नगर पालिकेत सत्ता द्या, तुम्ही सांगाल ते करू, असं मी म्हणालो होतो. मला सांगा आमचे विरोधक निवडून आले तर विकास कामे कुठून करणार आहेत? हे आपल्या लोकांना पटलं. विरोधकांकडे करण्यासारखं काही नाही, त्यामुळे बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही.
माजी आमदार राजाभाऊ राऊत यांची विरोधकांनी धडकी घेतली आहे. जंगलामध्ये जेंव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लांडगे कळपाने फिरायला लागतात. मात्र, आपण एकत्र फिरायला लागल्यानंतर तरी वाघाच्या तावडीतून वाचू, असं लांडग्यांना वाटतं. मात्र ते समाधान तात्पुरतं असत (बार्शीत भाजप विरोधात शिंदेसेना, ठाकरेसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन लढत आहेत).
माजी आमदार राजाभाऊ राऊत या वाघाचा धसका विरोधकांनी एवढा घेतलाय की बार्शीत सर्वात अनैसर्गिक युती झाली आहे. सगळ्या ब्लड ग्रुपची लोकं याठिकाणी एकत्र आली आहेत. मात्र दवाखान्यात गेल्यानंतर तुमच्याच ब्लड ग्रुपच रक्त मागितलं जातं, वेगळं रक्त जेव्हा बॉडीत जाते, तेंव्हा पेशंट...आता इथंल पेशंट.. असे सूचक विधानही गोरेंनी केले.
मी ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना झेडपी, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात. त्याला येणारा सर्व निधी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून येतो. मुख्यमंत्री सडक योजना, पंतप्रधान सडक योजना, 50/54, 30/54, ही सर्व कामे माझ्या खात्याच्या माध्यमातून होतात. मग सांगा सोपलसाहेब तुम्ही कुठल्या ग्रामविकासकडे जाणार आहात..?, अशा शब्दांत गोरे यांनी बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना प्रश्न केला.
राजाभाऊ तुम्ही जे जे काम सांगाल, ते सर्व होईल फक्त झेडपी आणि पंचायत समितीत भाजपचा झेंडा फडकवा. कारण बार्शीपुरता ग्रामविकास खात्याचा मंत्री राजाभाऊ राऊत आहेत. राजाभाऊसाठी मुख्यमंत्री यांचं स्पेशल पॅकेज कायम राहील. विधानसभेला पराभव झाला, त्यातूनही राजाभाऊ बाहेर पाडला आणि वाघासारखा बाहेर पडून जिथं दिसेल तिथे सुफडा साफ करायला लागला. धुरंदर चित्रपटातील डायलॉग प्रमाणे, ‘घायल हूं इसीलिये घातक हूं’ असं राजाभाऊंचं आहे, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
गोरे म्हणाले, राजाभाऊच राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. मी हरलो तरी माझा कार्यकर्ता हरला नाही पाहिजे, ही राजाभाऊंची भूमिका आहे. मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे एकाच हॉस्पिटलमध्ये सर्वरोग उपचार केंद्र आहे. पराभवाच्या जखमा बुजवयाच्या असतील, तर झेडपी,पंचायत समितीत भाजचा झेंडा लावा.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपचा झेंडा फडकेल, हे सांगण्यासाठी कोणत्याही कुडमुड्या ज्योतिषाची गरज नाही, असेही गोरे यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.