Eknath Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

CM Solapur Tour : मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा पुढे ढकलला; दौरा रद्द होण्याचे कारण आले समोर...

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 September : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येत्या बुधवारी (ता. 25 सप्टेंबर) सोलापूरला येणार होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. याबाबतची माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) वचनपूर्ती सोहळा सोलापुरात (Solapur) घेण्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली होती. त्याचे नियोजनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. सोलापूरच्या होम मैदानावर हा मेळावा होणार होता. मात्र, सलग पाचव्यांदा हा मेळावा पुढे ढकलावा लागण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थींना अनुदानाचे वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे येत्या बुधवारी (ता. 25 सप्टेंबर) सोलापूरच्या दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली होती. या सोहळ्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून तब्बल 40 हजार महिलांना आणण्याचे नियोजनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी प्रशासनाच्या वेगवेगळ्या समित्यांकडून पूर्ण करण्यात आलेली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून मिळाली, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा तब्बल पाचव्यांदा पुढे ढकलण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे.

पंतप्रधान, गृहमंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना त्यांच्या दौऱ्यावर उपस्थित राहावे लागणार आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आपल्या दौऱ्यामध्ये बदल करावा लागला. त्यातून सोलापूरमधील माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमासाठी दौरा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पुढे ढकलावा लागला.

मराठा नेत्यांमध्ये वाद

दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अंतरवाली सराटी येथे सुरू आहे. त्याचे पडसाद सोलापूरमध्येही उमटले आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याला विरोध करत त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिले आहे. त्याला मराठा समाजातील दुसऱ्या गटाने विरोध दर्शविला आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT