Chitra Wagh .jpg
Chitra Wagh .jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चित्रा वाघ म्हणाल्या, मुलींना काय कोंडून ठेवायचे का...

मुरलीधऱ कराळे

अहमदनगर : पारनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ओडिओ प्रकरणानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पारनेर तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेवर जोरदार टीका केली होती. पारनेर तालुक्यातील जवळे येथे बुधवारी (ता. 20) एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला. या मुलीचा मृतदेह घरातच आढळून आला. मृत मुलीच्या कुटूंबीयांची काल (सोमवारी) चित्रा वाघ यांनी भेट घेऊन सांत्वन केले. वाघ यांनी पारनेरच्या पोलिस निरीक्षकांची तक्रार अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडेही केली होती. त्यानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना पारनेर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. Chitra Wagh said, why do you want to confine the girls ...

चित्रा वाघ यांनी पारनेरमधील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. या घटनेचा तपास तातडीने करावा, तसेच महिलांवरील अन्यायाची दखल न घेणाऱ्या पारनेरच्या पोलिस निरीक्षकाचे निलंबन करावे, अशा मागण्या केल्या. या वेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, महिला आघाडीच्या अंजली वल्लाकट्टी, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

चित्रा वाघ म्हणाल्या, "सरकारचा पोलिसांवर वचक राहिला नाही. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. गेंड्याचे कातडे पांघरून सरकार झोपले आहे. दिवसाढवळ्या मुलींवर अत्याचार होतात. गुन्हेगाराला तत्काळ अटक होत नाही. पोलिस यंत्रणा काय करते? ही यंत्रणा राज्य सरकारच्या दावणीला बांधली आहे,’’ असा आरोप वाघ यांनी केला.

वाघ पुढे म्हणाल्या, ‘‘आज संबंधित पीडित कुटुंबाला भेट दिल्यानंतर निःशब्द झाले. काय बोलावे, कशा शब्दांत त्यांचे सांत्वन करावे, हे समजेना. ती मुलगी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत गेली. दुसऱ्या दिवशी ही घटना घडली. रोजच कुठे ना कुठे असे घडत आहे. सरकार मात्र सेलिब्रिटींच्या मुलांच्या अटकेबाबत चर्चा करीत आहे. त्याचा ऊहापोह केला जातो. गरिबांच्या मुली, बहिणींची अब्रू वेशीला टांगली जाते, याचे सरकारला काहीच देणे-घेणे नाही. मुलींना काय कोंडून ठेवायचे का, हे सरकारने एकदाचे सांगावे.

तोंडोळी येथेही महिलांवर अत्याचाराची घटना घडली. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री औरंगाबादला एका कार्यक्रमाला गेले; परंतु संबंधित अत्याचारित कुटुंबाची भेट त्यांनी घेतली नाही, याचे विशेष वाटते. सरकारमध्ये महिलांना ट्रोल केले जात आहे. क्रांती रेडकर प्रकरणातही तिला ट्रोल केले जात आहे. एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहे.’’

‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यास निलंबित करा

‘‘पारनेरमधील कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. तेथील पोलिस निरीक्षक घनश्‍याम बळप यांना आमदार नीलेश लंके पाठीशी घालतात. त्यांचे एकत्रित फोटो आपल्याकडे आहेत. तेथील तहसीलदारांवर गुन्हे दाखल करण्याचे कटकारस्थान कोणाचे, हे सर्वांना माहिती आहे. या तालुक्यातील दोन डॉक्टर मुलींना तेथील नेत्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे त्या नोकरी सोडून गेल्या. असे अधिकारी खाकी वर्दीवरील डाग आहेत. त्यांना तातडीने निलंबित करावे. बळप यांना संबंधितांच्या चाकरीला जाऊ द्या, अशी आमची मागणी आहे,’’ असे वाघ यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT