Shivendraraje Bhosale- Shashikant Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Politic's : राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच शशिकांत शिंदेंचा पहिला दणका शिवेंद्रराजेंना; मानकुमरेंसोबत बंद दाराआड चर्चा!

Vasantrao Mankumre Meet Shashikant Shinde : आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना धक्का देत वसंतराव मानकुमरे यांच्याशी मुंबईत चर्चा केली, त्यामुळे सातारा-जावळी मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

शशिकांत शिंदेंचा पहिला राजकीय डाव:
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय वसंतराव मानकुमरे यांना आपल्या गळाला लावून पहिला मोठा धक्का दिला आहे.

मुंबईतील गुप्त बैठक चर्चेत:
मुंबईत झालेल्या शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे आणि दत्ता गावडे यांच्या बंद दरवाजाआड बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जावळी तालुक्यात राजकीय तापमान वाढले आहे.

जावळीतील समीकरणात बदलाची शक्यता:
मानकुमरे यांचा म्हसवे गट आरक्षित झाल्याने आणि शिंदेंची जावळीतील ताकद लक्षात घेता, दोघांची जवळीक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोठे राजकीय उलथापालथ घडवू शकते.

Satara, 16 October : आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सूत्रे हाती घेताच सातारा जिल्ह्यात पहिला दणका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिला आहे. शिवेंद्रसिंहराजेंचे निकटवर्तीय आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांना शिंदेनी गळाला लावले आहे. मानकुमरे आणि शशिकांत शिंदे यांची मुंबईत बंद दरवाजाआड चर्चा झाली आहे, त्यांच्यासोबत जावळीचे माजी उपसभापती दत्ता गावडेही उपस्थित होते, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजेंना दणका देण्याची तयारी शशिकांत शिंदेंनी केल्याची चर्चा सुरू आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांच्यासोबत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांची मुंबईत बंद दरवाजाआड चर्चा झाली आहे. दोन्ही नेत्यांच्या भेटीने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जावळी तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सातारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये घमासान सुरू झाले आहे. त्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, जावळीचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदे यांच्यासोबत वसंतराव मानकुमरे (Vasantrao Mankumre )आणि जावळीचे माजी उपसभापती दत्ता गावडे यांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जावळी विधानसभा मतदारसंघातून आमदार शशिर शिंदे हे दहा वर्षे विधानसभेवर निवडून आले आहेत. तेव्हा वसंतराव मानकुमरे शिवसेनेत होते. दरम्यान, आमदार शिंदे यांनी पुढाकार घेऊन मानकुमरे यांना राष्ट्रवादीत आणून जिल्हा परिषदेवर संधी दिली आहे.

त्यानंतरच्या काळात आमदार शिंदे हे कोरेगाव मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यानंतर मानकुमरे यांनी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्यांनी मानकुमरेंना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.

मानकुमरे यांचा म्हसवे जिल्हा परिषद गट यंदा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे, त्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. आमदार शिंदे जरी कोरेगावमध्ये गेले असले तरी आजही त्यांची जावळी तालुक्यात ताकद आहे. त्याचबरोबर त्यांचे मूळ गाव म्हसवे गटात येत असल्याने विशेष महत्त्व आहे.

शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे हे दोघे आजवर कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचे राजकारण एकमेकांना पूरक राहिल्याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. त्यामुळे त्यांची नुकतीच झालेली भेट सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

1. आमदार शशिकांत शिंदे यांनी कोणाला आपल्या गळाला लावले आहे?
वसंतराव मानकुमरे, जे शिवेंद्रसिंहराजेंचे निकटवर्तीय आहेत.

2. ही बैठक कुठे झाली?
मुंबईत बंद दरवाजाआड बैठक झाली.

3. या भेटीचे राजकीय महत्त्व काय आहे?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.

4. मानकुमरे यांचा गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे?
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT