Rajan Patil-Umesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Angar Upper Thasil Office : राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत गोंधळ; ‘अनगरला अप्पर तहसील नेण्याचं कारण काय,’ महिलेने विचारला जाब

Vijaykumar Dudhale

Solapur, 29 July : अनगर येथे मंजूर करण्यात आलेल्या अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्याचे राजकारण पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या विरोधात सर्वपक्षीय नेते उभे ठाकले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढून आजी माजी आमदारांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

आज राजन पाटील समर्थकांनी बोलावलेल्या बैठकीत एका महिला पदाधिकाऱ्याने उमेश पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देताना मोहोळला अनगर जवळ की पेनूर असा सवाल विचारताच बैठकीत एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधित महिला पदाधिकाऱ्याला बैठकीतून बाहेर काढले, त्यानंतर गोंधळ कमी झाला.

अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून मोहोळ तालुक्यात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि विद्यमान आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांच्याविरोधात तालुक्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळी एकवटले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी काल अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात मोर्चा काढत आजी-माजी आमदारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर आज माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांच्या समर्थकांनी बैठक बोलावली आहे.

या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट आमने-सामने येण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा मोहोळ शहरात तैनात करण्यात आला आहे. प्रचंड पोलिस बंदोबस्तात मोहोळमध्ये राजन पाटील समर्थकांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला महिला पदाधिकारीही उपस्थित होती.

अनगरच्या अप्पर तहसील कार्यालयाच्या समर्थनार्थ बोलावलेल्या बैठकीचा मी निषेध करते. मी 17 गावांतील लोकांचा उमेश पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या बैठकीला आले आहे. अनगर जवळ आहे की पेनूर जवळ आहे, असा सवाल त्या महिला पदाधिकाऱ्याने विचारताच बैठकीत एकच गोंधळ उडाला.

संबंधित महिलेच्या विरोधात पाटील समर्थक प्रचंड आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करत संबंधित महिलेला बैठकीतून बाहेर नेले. त्यानंतर ही बैठकी पुढे सुरू झाली. मात्र, अप्पर तहसील कार्यालयावरून मोहोळ तालुक्यात राजकीय तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण आहे.

अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय रद्द झाले पाहिजे. हे अप्पर तहसील कार्यालय आमदारांनी आणले आहे. मोहोळ आणि अनगर मधील अंतर अवघे पाच किलोमीटरचे आहे. असे असतानाही अप्पर तहसील कार्यालय अनगरला नेऊन लोकशाहीची हत्या करण्याचे काम करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीपासून इतर सर्व अर्ज भरायला अनगरला जावं लागेल, तसेच प्रशासकीय यंत्रणाही त्यांचीच असणार. उतारंसुद्धा राहणार नाहीत, त्यांच्याच नावावर केले जातील, अशी त्यांची प्रवृत्ती आहे.

शासकीय कार्यालय अनगरला न्यायला नको होतं. मोठ्या प्रमाणात निधी आणल्याबद्दल आम्ही आमदार यशवंत माने यांचे कौतुक करत होतो. पण शासकीय कार्यालय अनगरला न्यायचं कारण काय आहे. महायुतीत असूनही माझं तोंड दाबण्याचे काम केले जात आहे, असेही संबंधित महिलेने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT