Congress Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : सोलापूर राष्ट्रवादीचे कॅप्टन महेश कोठेंच्या मतदारसंघावर काँग्रेसचा डोळा; तुतारीचे वाढले टेन्शन...

Mahavikas Aghadi : प्रणिती शिंदे यांच्या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने आता थेट मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारसंघावर दावा करण्यास सुरूवात केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 15 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या सुमारे ७४ हजार मतांनी निवडून आल्या आहेत. प्रणिती यांच्या विजयामुळे आत्मविश्वास वाढलेल्या काँग्रेसने आता थेट मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारसंघावर दावा करण्यास सुरूवात केली आहे. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन समजले जाणारे, माजी महापौर महेश कोठे इच्छूक असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ काँग्रेसकडे घेण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यावर राष्ट्रवादी आणि कोठेंची प्रतिक्रिया काय असणार, याची उत्सुकता आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर मध्य हे दोन मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे आहेत. सोलापूर शहर उत्तर हा मतदारसंघ (Solapur City North constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP) वाट्याला गेलेला आहे. दोन्ही काँग्रेसच्या आघाडीतील हे जागा वाटप आहे. मात्र, आता दोन्ही काँग्रेसच्या (Congress) सोबत शिवसेना आलेली आहे. त्यात शिवसेनेच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येणार, याची उत्सुकता आहे.

सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे ह्या तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. तसेच, दक्षिण सोलापूर मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे यांना मताधिक्य मिळाले आहे. या मतदारसंघातून काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशिवाय काही स्थानिक नेतेही इच्छूक आहेत.

दुसरीकडे, सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे ह्या तीन वेळा निवडून आलेल्या आहेत. तसेच या मदारसंघातून निसटता का होईना काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना लीड आहे. त्यामुळे सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुकांची रांग काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र, हा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मागितला आहे. त्यामुळे काँग्रेसकडे कुठला मतदारसंघ राहणार आणि त्यातून कोण निवडणूक लढविणार याची उत्सुकता आहे.

सोलापूरमधील शहर उत्तर हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूरमधील प्रमुख नेते, माजी महापौर महेश कोठे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोठे यांनी तशी तयारीही केली आहे. याच मतदारसंघातून ते गेल्या काही वर्षांपासून सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून येत आहेत. मात्र याच मतदारसंघावर आता काँग्रेसने दावा केला आहे.

सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून २००९ मध्ये काँग्रेसचा केवळ दहा हजार मतांनी पराभव झाला. त्यावेळी राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केली, त्यामुळे येथे काँग्रेसचा पराभव झाला होता. त्यानंतर आघाडीत २०१४ आणि २०१९ मध्ये हा मतदारसंघ आपण राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. मात्र, राष्ट्रवादीची अनामत जप्त झाली.

आता प्रणिती शिंदेंच्या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्याचा फायदा काँग्रेसला विधानसभेत मिळू शकतो, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT