Latur, 15 June : नीट परीक्षेच्या निकालातील गोंधळामुळे संपूर्ण देशातील शैक्षणिक क्षेत्र हादरून गेले असून या परीक्षेतील पावित्र्य धोक्यात आल्याने विद्यार्थी भविष्याच्या चिंतेने ग्रासले आहेत. सरकारने या परीक्षेतील गैरप्रकार तातडीने शोधून काढून अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना अश्वस्त करणे आवश्यक बनले आहे, असे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
नियोजित वेळेपूर्वी घाई गडबडीत ऐन लोकसभा निवडणुकीच्या निकालादिवशीच (Lok Sabha Election Result) नीट परीक्षेचा (NEET Exam) निकाल जाहीर झाला. या निकालात तब्बल 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 720 मार्क मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यात 1563 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिल्याची माहिती पुढे आली आणि त्यानंतर एका पाठोपाठ या परीक्षेतील अनेक गैरप्रकार उघड होत आहेत.
एकंदरीत या परीक्षेचे पावित्र्यही आता धोक्यात आल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. परिणामी देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण तयार झाले आहे. डॉक्टर बनून रुग्ण सेवा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रचंड मेहनत आणि कष्ट करून विद्यार्थी ही नीटची परीक्षा देतात. यावर्षी देशातील 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
या परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचे उघड झाल्यानंतर गुजरात, हरियाणा, बिहार यांसह इतर अनेक राज्यात पेपर फुटीचे प्रकारही आता पुढे आले आहेत. त्यामुळे परीक्षा दिलेल्या आणि भविष्यात ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात तर या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. येथील वैद्यकीय सेवेचा लौकिक जगभरात पसरलेला आहे, त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर होण्याकडे मोठा कल आहे. राज्यात आणि देशात शिक्षणाचा आदर्श पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूरमध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी खूप मोठी तयारी करून नीटची परीक्षा देतात, त्यामुळे दरवर्षी राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूरचे असतात.
अलीकडच्या काळात मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह राज्यात सर्वत्र या पॅटर्नचे अनुकरण होत आहे. अथक परिश्रम करून गुणत्तेच्या जोरावर या परीक्षेत यश मिळवण्याची खात्री बाळगून असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नीट परीक्षेतील गोंधळामुळे चिंतेचे वातावरण आहे. सध्या नीट परीक्षेतील गोंधळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, हे जरी खरे असले तरी महाराष्ट्र सरकारनेही राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, याची हमी देणे आवश्यक आहे, असल्याचे अमित देशमुख म्हणाले.
यूपीएससी, एमपीएससीपासून, विविध खात्यांच्या भरती प्रक्रियेत पेपर फुटी आणि गैरप्रकार झाल्याच्या घटना ताज्या आहेत. त्यात आता नीट परीक्षेचे पावित्र्यही संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीत सर्व प्रकारच्या परीक्षा आणि नोकर भरतीची प्रक्रिया पारदर्शक बनवणे अनिवार्य बनले आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू करून त्यासंबंधीची माहिती प्रसारित करणे गरजेचे असल्याचेही आमदार अमित देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.