Solapur/Pandharpur News : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशातच पक्ष प्रवेशांना देखील गती आली असून भाजपनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश होत आहेत. नुकताच उद्धव ठाकरेंना एकनाश शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे. त्यापाठोपाठ शिंदे आता काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येथे मंत्री भरत गोगावलेंनी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला गळाला लावले असून तो त्यांच्या संपर्कात आहे. यामुळे लवकरच आणखीन एक मोठा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्व. माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाला बळ देण्यासाठी भगीरथ भालके काम करत आहेत. पण गेल्या नऊ महिन्यापासून ते नॉटरीचेबल झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते भालके राजकारणातून बाहेर गेले होते. पण आता पुन्हा एकदा ते अॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहेत. पण यावेळी ते शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्याबरोबर दिसल्याने विविध चर्चांना उधान आले आहे. गोगावले पंढरपूर दौऱ्यावर असताना भगीरथ भालके त्यांच्याबरोबर दिसल्याने आता ते शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरू जाल्या आहेत.
स्व. माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर 2021 च्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीने संधी दिली होती. पण त्यांना यश आले नाही. भगीरथ भालके यांचा थोडक्यात पराभव झाला. त्यानंतर 2024मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांना झुलवत ठेवल्याने त्यांनी काँग्रेसचा रस्ता धरला होता.
भालके यांच्यासाठी खा. प्रणिती शिंदे यांनी दंड थोपटत ताकद लावली होती. तर दिल्लीतून उमेदवारी जाहीर केली. तर राष्ट्रवादीतच पहिली बंडखोरी येथे झाल्याने महाविकास आगाडीतील पक्षात थेट लढत झाली. तसेच भालके यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी देखील प्रचार केल्याने भगीरथ भालके यांचा पराभव झाला होता. यानंतरच भालके नॉट रिचेबल झाले होते.
दरम्यान आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्या रणनीती आखताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर खा.प्रणिती शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत भालकेंच्या नॉटरिचेबलचा मुद्दा उपस्थित झाला होता. तसेच विकास कामावरून खंत व्यक्त करण्यात आली होती.
यावेळी भालके यांच्या कार्यकर्त्यांनी देखील निवडणुकीवेळी भालके यांना पक्षाने उमेदवारी दिली होती. पण पक्षातील काही नेत्यांनी थेट विरोधी उमेदवाराचा प्रचार केला. ज्यामुळे काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला. जे व्हायला नको होते. अशी खंत व्यक्त केली होती. यानंतर आता मनातील सल बाजूला ठेवून भालके कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी पुन्हा सक्रीय झाले आहेत. पण गोगावलेंच्या भेटीमुळे भालके शिवसेनेत प्रवेश करणार की दुसरा पर्याय निवडणार अशा चर्चा आता समोर येत आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक माजी आमदार फोडला आहे. करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मंगळवारी (ता.10 जून) रात्री उशिरा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असून जगतापांच्या शिवसेना प्रवेशाचे कोडे मात्र अनेकांना पडले आहे. जगतापांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना मदत केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.