Kolhapur Political News: काँग्रेसचे एकनिष्ठ आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर आणि लोकसभेच्या निकालानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोण करणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीत दिवंगत आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांच्या प्रचारामुळे शाहू महाराज छत्रपती सर्वाधिक मताधिक्य दिल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून दावेदार कोण असणार? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे राजकीय वारसदार त्यांचे पुत्र राहुल की राजेश असणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांना तडीसतोड समजले जाते. त्यांना मिळणारी सहानुभूती, संपर्क, राजकीय अनुभव, आणि मतदार संघात वाढलेले काँग्रेसचे प्राबल्य पाहता पी. एन.यांचे वारस म्हणून राहुल यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे.
आमदार पी. एन. पाटील यांनी दोन वेळा करवीर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2014 आणि 2019 ला माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी प्रतिनिधित्व केले. पाटील आणि नरके यांची करवीर विधानसभा मतदारसंघात चांगलीच मोठ आहे.
दोघांनीही मतदारसंघातील कार्यकर्ते बांधून ठेवले आहेत. अशा परिस्थितीत करवीरमधून मिळालेले मताधिक्य हे आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील गटाला पूरक आहे. शिवाय पाटील गटाच्या मागे सहानुभूती देखील आहे.
खासदार शाहू महाराज आणि दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे मैत्रीपूर्ण घनिष्ठ संबंध होते. याचं मैत्रीत्वातून शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ करवीर विधानसभा मतदार संघात रान उठवले. पण काही दिवसांनी आमदार पी. एन. पाटील यांचं निधन झालं.
लोकसभेचा निकाल झाल्यानंतर करवीर विधानसभा मतदारसंघातून जवळपास 71 हजाराचे मताधिक्य पी. एन. पाटील यांनी दिले. शाहू महाराज यांच्या विजयात पी. एन. पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे.
आमदार पी.एन. पाटील यांच्यासोबत त्यांचे पुत्र राहुल व राजेश आघाडीवर होते. राहुल यांना राजकीय क्षेत्राचा अनुभव आहे. पाटील यांच्यानंतर त्यांचा राजकीय वारसदार कोण ठरणार याबाबत चर्चा सुरु आहेत.
विधानसभेला नरके यांच्या विरोधात कोण उतरणार? याची चर्चा मतदार संघात सुरु आहे. राहुल की राजेश यापैकी कोण आगामी विधानसभा लढवणार, याविषयी उत्सुकता आहे. राहुल हे परिते जिल्हा परिषद गटातून विजयी झाले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काही काळ काम केले आहे.
पी. एन. यांनी सुरू केलेल्या राजीव सूतगिरणीचे ते अध्यक्ष आहेत. पी. एन. यांच्याएवढी नसली तरी काही प्रमाणात मतदारसंघात राहुल यांच्याविषयीही सहानुभूती आहे. राजकीय अनुभवही पाठीशी आहे. त्यामुळे राहुल हेच पी.एन.यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात राजकीय वारसदार ठरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.