Malkapur, 23 February : सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेवर भाजपने निर्विवादपणे वर्चस्व मिळविले आहे. नगरपालिकेवर प्रथमच जनतेमधून भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. निवडणुकीनंतर अवघ्या तीन महिन्यांतच भाजप नगराध्यक्षांच्या मदतीला काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके धावून गेले. भाजपच्या नगराध्यक्षांना पालिकेची शासकीय गाडी मिळावी, अशा मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. गाडी उपलब्ध न केल्यास आंदोलनाचाही इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप नगराध्यक्षांच्या मदतीला काँग्रेस नेता धावून गेल्याच्या घटनेची कराडमध्ये एकच चर्चा सुरू आहे.
मलकापूर (Malkapur) नगराध्यक्षांच्या गाडीचा विषय गेली अनेक वर्षांपासून वारंवार चर्चेला येत आहे. मात्र, अद्यापपर्यंत नगराध्यक्षांच्या गाडीचा विषय मार्गी लागलेला नाही. मागील पंचवार्षिकमध्ये नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी नगराध्यक्षा नीलम येडगे होत्या, तर मनोहर शिंदे हे उपनगराध्यक्ष होते. त्यावेळीही सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्र्यांकडे मलकापूर नगराध्यक्षांसााठी प्रशासकीय गाडी द्यावी, अशी मागणी केली होती. काँग्रेसची सत्ता गेली, पण गाडी मिळाली नव्हती. नगराध्यक्षांना गाडीचा निर्णय अचानकपणे होत नाही, असे वारंवार सांगितले गेले आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन नगरपालिकेवर भाजपची (BJP) सत्ता आली. नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या तेजस सोनवणे काम पाहत आहेत. मात्र, त्यांना शासकीय गाडी उपलब्ध व्हावी; म्हणून तडाके यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मलकापूर नगरपालिका ही संपूर्ण नावलौकिक प्राप्त व आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी पालिका म्हणून ओळखली जाते. मात्र, नगराध्यक्षांना पालिकेकडून अद्याप शासकीय वाहन मिळू शकलेले नाही.
नगराध्यक्ष हे शहराचे प्रथम नागरिक असून ते जनतेतून निवडून आलेले प्रतिनिधी आहेत. एका नामांकित नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी अधिकृत कामासाठी दुचाकीवरून फिरणे, हे पदाच्या प्रतिष्ठेला व पालिकेच्या प्रतिमेला साजेसे नाही. केवळ ते अनुसूचित जाती प्रवर्गातील आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना जनसामान्यांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करून नगरपालिकेच्या मालकीची गाडी नगराध्यक्षांना उपलब्ध करून द्यावी.
जोपर्यंत पालिकेच्या मालकीची नवीन गाडी खरेदी केली जात नाही.तोपर्यंत नगराध्यक्षांच्या पदाला साजेशे वाहन तातडीने भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात यावे. लोकप्रतिनिधींच्या सन्मानाचे रक्षण करून त्यांना आवश्यक सर्व सोय सुविधा पुरविण्यात याव्यात. प्रशासकाने या अर्जाचा गांभीर्याने विचार करून तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व वरिष्ठ स्तरावर दाद मागण्यात येईल असा इशाराही तडाके यांनी दिला आहे.
तडाके नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे उमेदवार; ऐनवेळी माघार...
नुकत्याच झालेल्या मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने निर्विवादपणे वर्चस्व निर्माण केले आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी प्रत्यक्ष नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती. नगराध्यक्षांना गाडी मिळावी; अशी मागणी त्यांनी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या लेटर पॅडवर केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.