Kolhapur News: 'गोकुळ'मधील महायुतीचा वाद शांत झाला असताना आता पारंपरिक विरोधकांचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु झाला आहे. राजकीय कट्टर विरोधक असलेले राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी गोकुळ दूध संघावरून गेल्या दोन दिवसांपासून एकमेकांवर टीकेची झोड उठवली आहे.
आमदार सतेज पाटील यांच्याकडून थेट राजाराम सहकारी साखर कारखाना आणि भीमा सहकारी कारखाना याबाबत विधान करत पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडले आहे. त्यामुळे गोकुळचे रणांगण पुढच्या काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.
राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत रडीचा डाव खेळून महाडिक गटाने सत्ता मिळवली. सध्या कारखान्यावर 356 कोटींचं कर्ज आहे. यंदाच्या हंगामात एक कांडेही गाळप झाले नाही. दुसरीकडे भीमा सहकारी साखर कारखान्याला सभासदांची 30 कोटींची देणी थकविल्याबद्दल साखर आयुक्तालयाने मालमत्ता जप्तीची नोटीस काढली आहे. 471 कोटींचे कर्जही भीमा कारखान्याने उचलले आहे. त्या कर्जाच्या व्याजाचे काय? हा प्रश्न आहे. आपल्या भ्रष्ट कारभाराने महाडिकांनी भीमा कारखाना मोडीत काढला असल्याची टीकाही पाटील यांनी केली.
बहुमताची भाषा करणाऱ्या धनंजय महाडिक यांनी, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाडिक यांनी किती नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले? हे जाहीर करावे. दुसऱ्याच्या जीवावर बहुमताची भाषा करणाऱ्या महाडिक यांनी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करावे, अशीही टीका पाटील यांनी केली.
गोकुळवर महादेवराव महाडिक यांची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांकडून कधीही राजकीय हस्तक्षेप झाला नाही, असे मी माध्यमांशी बोललो याचा अर्थ त्यांचा कारभार चोख होता किंवा त्यांच्या कारभाराला माझ्याकडून ना-हरकत प्रमाणपत्र दिले, असे अजिबात समजू नका, असंही पाटील यांनी महाडिकांना ठणकावलं.
सतेज पाटील यांनी गोकुळला मल्टिस्टेट करून जिल्ह्यातील दूध संस्थांचे महत्त्व कमी करणे, महाडिकांच्या मालकीचे टँकर, पॅकिंगचा ठेका यांसह अनेक कारनाम्यांच्या भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळूनच गेल्या निवडणुकीत दूध उत्पादकांनी सत्तांतर केले होते असा धक्कादायक आरोपही केला.
महाडिक हे कधीही स्वतः संस्था काढत नाहीत, तर दुसऱ्यांनी काढलेल्या संस्था बळकवतात, हा इतिहास महाराष्ट्राला माहीत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.
गोकुळच्या निवडणुकीत स्वाभिमानी सभासद महाडिक यांना पराभवाचा दणका देतील. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटील यांच्या पाच ते सात जागा निवडून येतील, अशी दर्पोक्ती महाडिकांनी केली होती.
महायुतीमधील तीन भावकीतील झाडून सारे नेते एका बाजूला असताना 34 नगरसेवक निवडून आणून आम्ही ताकद दाखवून दिली. त्यामुळे महाडिक यांनी 34 आकडा लक्षात ठेवावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.