Solapur, 07 September : सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या विधानसभा मोहिमेला खो बसण्याची शक्यता आहे.
कारण, सोलापूर शहर मध्य मतदारसंघ आडम मास्तर यांच्यासाठी सोडू नये, अशी मागणी काँग्रेसच्या विभागीय बैठकीत पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली आहे, त्यानंतर काँग्रेसच्या शहराध्यक्षांनीही हा मतदारसंघ आडम मास्तरांना सोडण्याचा प्रश्नच नाही, असे ठणकावून सांगितले. त्यामुळे आता आडम मास्तर काय करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam Master) यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्ष या नात्याने प्रणिती शिंदे (Praniti shinde) यांच्यासाठी काम केले होते. त्याचवेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य मतदार संघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळावा, अशी आग्रहाची मागणी केली होती.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येच्युरी यांची सुशीलकुमार शिंदे (sushilkumar Shinde) आणि सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचेही आडम यांनी सांगितले होते. मात्र, त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनी कुठलेही भाष्य केले नव्हते.
लोकसभा निवडणुकीनंतर आडम मास्तर यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. त्या भेटी त्यांनी ‘सोलापूर शहर मध्य’सह १२ मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सोडावेत, अशी मागणी केली होती. पवारांनंतर आडम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांचीही संगमनेर येथे जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाची मागणी केली होती.
काँग्रेस नेत्यांकडून विधानसभेच्या कुठल्याही मतदारसंघाबाबत शब्द देण्यात आलेला नाही. दुसरीकडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पदाधिकारीही सोलापूर शहर मध्य मतदार संघातून काँग्रेसचाच उमेदवार निवडणूक लढवेल, असे ठणकावून सांगत आहेत, त्यामुळे आडम मास्तर यांची भूमिका काय असणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.
दरम्यान, नरसय्या आडम मास्तर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काँग्रेस पक्ष आपल्याला सोलापूर शहर मध्य मतदारसंघ सोडणार नाही, अशी भीती व्यक्त केली होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या तयारीला लागावे, असे आवाहन त्या कार्यक्रमातून केले होते. तीच भीती खरी ठरण्याची शक्यता सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.