Solapur, 25 July : संपूर्ण राज्यात ठेकेदारांनी केलेल्या कामांची सुमारे 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी असताना सोलापूर जिल्ह्यातील बारा आमदारांनी गेल्या तीन महिन्यांत नव्याने सुमारे 43 कोटी रुपयांची कामे सुचवली आहेत. त्यातील साडेचार कोटी रुपयांच्या कामाला मान्यता मिळाली असून त्यातील काही कामे सुरू झाल्याची माहिती आहे. मात्र, आधीच्याच थकबाकीमुळे ठेकेदार अडचणीत आलेले असताना या नव्या कामाला ठेकेदार मिळणार का?, मिळाला तरी त्याचे बिल निघणार का?, असे सवाल उपस्थित होत आहेत.
मागील काळात केलेल्या कामांचे सुमारे 89 हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे (State Government) प्रलंबित देयके आहेत. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तरुण ठेकेदार हर्षल पाटील यांनी जलजीवन योजनेंतर्गत केलेल्या कामाचे एक कोटी चाळीस लाख रुपयांचे बिल थकल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांची बिले अडकल्याने ठेकेदार हे टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत.
एकीकडे हजारो कोटी रुपयांची ठेकेदारांची देयके थकल्याने राज्यातील विकास कामे ठप्प झाली आहेत. पण, दुसरीकडे नव्या कामाला मंजुरी देण्याचा सपाटाही सुरू आहे. यामध्ये सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील बारा आमदारांनी गेल्या तीन महिन्यांत तब्बल 43 कोटी रुपयांची कामे सुचवली असून त्यातील काही कामांना प्रशासकीय मान्यताही मिळाल्याची माहिती आहे.
राज्य सरकारकडून आमदारांना पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो, या निधीतून रस्ते, सभागृह, पाणी, गटार, इतर सुविधांसाठी आमदार निधी देत असतात. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवून त्याचा पाठपुरावा केला जातो. जिल्हा नियोजन विभाग संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतचा आराखडा बनवून घेतो. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर प्रशासकीय मान्यता दिली जाते.
चालू आर्थिक वर्षात विकास कामे सुचवण्यासाठी सर्वच आमदार पुढाकार घेताना दिसत आहेत. मात्र, सध्या आमदार निधीही मिळालेला नाही, तरीही प्रस्तावित कामांना प्रशासकीय मान्यता देऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यासाठी आमदारासोबतच जिल्हा प्रशासनातील अधिकारी पुढाकार घेताना दिसत आहेत, त्यामुळे या कामाला मान्यता मिळाली तरी निधी मिळणार का? केलेल्या कामाचे ठेकेदारांना पैसे मिळणार का? असे प्रश्न ठेकेदारांच्या थकलेल्या बिलाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त होताना दिसत आहेत.
सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सहा कोटींची, तर करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी 5.95 कोटींची, आमदार राजू खरे यांनी 4.65 कोटींची, माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी चार कोटींची, सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी साडेतीन कोटींची, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी तीन कोटींची, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी तीन कोटी, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी तीन कोटींची, तर माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी अडीच कोटींचे, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी 2.3 कोटी, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 1.90 कोटी रुपयांची कामे सुचवली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.