BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Indapur BJP : झेडपीत धुव्वा उडताच इंदापूर भाजपमध्ये वादाचा भडका; सोयीचे राजकारण, फितुरीचे गंभीर आरोप

Zilla Parishad- Panchayat Samiti Election : इंदापूर तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत खातेही उघडता आले नाही. पराभवानंतर पक्षात अंतर्गत वाद आणि फितूरीच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले.

सचिन लोंढे

Pune, 23 February : संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाची घौडदौड सुरू असताना संपूर्ण पुणे जिल्ह्यात आणि त्यातही इंदापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पक्षाला खातेही उघडता आले नाही. निवडणुकीतील अपयशावरून आता भाजपमध्ये अंतर्गत वाद पेटला आहे. त्यातूनच भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश खारतोडे यांनी स्वकीयांवर सोईचे राजकारण आणि फितूरीचा आरोप केला आहे.

पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर (Indapur) पंचायत समितीच्या सर्वच सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळविला. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले होते. या दिग्गज नेत्यांच्या एकत्रित येण्यामुळे भाजपला एकाही जागेवर यश मिळवता आला नाही. त्याच अपशयावरून आता भाजपमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यात भाजपला (BJP) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीत भाजपला खातेही उघडता आले नाही. मात्र यामागे भाजपत नव्याने दाखल झालेल्या नेत्यांनी संगनमताने राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या सोयीचे आणि फितूर उमेदवार दिले, असा आरोप भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष रमेश खारतोडे यांना केला आहे.

स्वतःचे उद्योगधंदे सुरळीत सुरु ठेवण्यासाठी भाजपत प्रवेश करुन, जुन्या कार्यकर्त्यांना डावलत निर्णय घेतल्याने भाजप उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. ही बाब पक्षवाढीच्या दृष्टीने घातक आहे, त्यामुळे तालुक्यात स्वतंत्र समिती अथवा पक्ष निरीक्षकाची नियुक्ती करुन चौकशी करावी, अशी मागणी खारतोडे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत खारतोडे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात आम्ही गेल्या ३५ वर्षांपासून भाजपचे काम प्रामाणिकपणे करत आहोत. पक्ष सत्तेत नसतानाही सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलने, मोर्चे काढून जनतेपर्यंत पक्ष पोचविण्याचा प्रयत्न केला. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपचा झेंडा फडकला. मात्र, त्याला इंदापूर तालुका अपवाद ठरला आहे.

पक्ष घटनेनुसार आवश्यक तीन वर्षांची सक्रीय सेवा नसलेल्या व सदस्यत्वाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण न केलेल्या लोकांकडे तालुक्यातील भाजपची सगळी सूत्रे देण्यात आली. या लोकांनी स्वतःचे उद्योगधंदे वाचविणे, गटबाजी करणे आणि जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्याचा प्रकार केला आहे, असा आरोप खारतोडे यांनी केला आहे.

या लोकांनी निवडणुकीदरम्यान बूथ यंत्रणा राबविली नाही. यामुळे पक्षाबाबत जनतेत वेगळा संदेश गेला असून, त्याचा मोठा फटका पक्षाला बसला आहे. यामुळे या प्रकाराची पक्ष पातळीवर चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केल्याचे खारतोडे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT