Solapur, 30 August : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे शनिवारी (ता. २९ ऑगस्ट) माढ्याच्या दौऱ्यावर होते. माढ्यात आल्यानंतर त्यांनी प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली. त्यानंतर माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहकार मंत्री पाटील यांनी बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याचा सल्ला दिला. तो देताना काही टिप्सही त्यांनी रणजितसिंहांना दिल्या, त्यामुळे आमदार पाटलांना भेटून आलेल्या सहकार मंत्र्यांनी शिंदेंनी विधानसभा लढण्यासाठी दिलेल्या सल्ल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे काल माढ्याच्या दौऱ्यावर होते. माढ्यात आल्यानंतर त्यांनी आमदार अभिजीत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास भेट दिली. त्या ठिकाणी चर्चा केल्यानंतर मंत्री पाटील यांंनी मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात रणजितसिंह शिंदेंना विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स दिल्या.
सहकार मंत्री पाटील म्हणाले, प्रतापसिंह मोहिते पाटील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतानापासून माझी आणि बबनराव शिंदे यांची ओळख आहे. मला कारखाना उभा करण्यासाठी संजयमामा शिंदे यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट दिला. त्यानंतर मी २००९ मध्ये जुना कारखाना घेतला आणि कारखानादारीसंदर्भात काही मार्गदर्शन पाहिजे असेल मी एकाही सिंहला मी फोन करायचो नाही. पण बबनराव शिंदे यांचं मार्गदर्शन घ्यायचो.
आमदार अनेक झाले असतील पण बबनराव शिंदे यांनी जे काम केले, ते इतर कोणी काम केलं नाही. माढ्याच्या जनतेने बबनराव शिंदे यांना सहा वेळा निवडून दिलं. नेत्याची जपणूक कशी करावी, हे पश्चिम महाराष्ट्राकडून शिकावं लागतं, असेही त्यांनी नमूद केले.
ते म्हणाले, बबनराव शिंदे मंत्री नक्की झाले असते. पण माझा मतदारसंघ पाणीदार करण्यासाठी त्यांनी मंत्रिपदाला लाथ मारली. तुमच्याकडे धरणातील पाणी आणण्याचे काम केलं. माझ्यासारख्यानं मंत्रिपद घेतलं असतं आणि हेही काम केलं असतं. पण बबनराव शिंदे यांनी पाण्याच्या कामाला अधिक वेळ देण्यासाठी मंत्रिपद नाकारले.
बबनराव शिंदे हे सभागृहात कमी बोलायचे पण अधिकाऱ्यांकडून काम करून घेण्याची त्यांची हातोटी होती. अनेकदा ते मंत्र्यांच्या दंडाला धरून माझं हे काम आहे आणि फायलीवर सही कर असे सांगायचे. एवढी धमक त्यांच्यात होती, अशी आठवणही सहकार मंत्र्यांनी सांगितली.
ते म्हणाले, राजकारण आणि बॅंक एकत्रित चालवणं खूप अवघड असतं. पण बबनराव शिंदे यांनी माढेश्वरी बॅंकेच्या माध्यमातून तेही करून दाखवलं. माढ्यातील जनतेचा आशीर्वादामुळेच बबनराव शिंदे यांची एवढी मोठी हृदरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.
रणजितसिंह शिंदे तुमचा २०२४ च्या निवडणुकीत पराभव झाला. पण त्यामुळे खचून जाऊ नका. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. यादी करा, कुठं चुकतोय आपण. लोकांच्या काय अपेक्षा आहेत. बबनराव शिंदे यांना कुठलाच राजकीय वारसा नव्हता पण त्यांनी एवढं मोठं विश्व निर्माण केलं. आता तुम्हाला सोपं आहे. बबनदादांनी सगळीकडं तयारी करून ठेवली आहे. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे म्हणून तुम्ही गेला तर तुमच्यासाठी दारं खुली आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
रणजितसिंह, मागं काही चुका झालेल्या आहेत. पण आता सर्वसामन्य माणसाला भेटा, सहज उपलब्ध व्हा. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा. ते तुमच्यासोबत येणार आहेत. आपल्याकडून काय चुकतं याची माहिती आहे. आम्हालाही लोकांनी घरी बसवलं. पण आम्ही सुधारणा केल्या. माढ्यात आल्यावर कार्यकर्त्याच्या घरी जाऊ नका. बॅंकेत, पंचायत समितीत बसा. कारण आपण एखाद्याच्या घरी गेलो तर बाकीच्यांना ॲलर्जी होते. या सर्व गोष्टी खतरनाक आहेत. त्यामुळे चूक मान्य करून सुधारणा केल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.