Deepak Salunkhe
Deepak Salunkhe  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mangalveda Politic's : ‘प्रशांतराव, तुम्ही म्हणताय म्हणून ढोबळे भाजपत आहेत; पण आम्हाला तसं..’ : साळुंखेंनी ठेवले ढोबळेंच्या दुःखावर बोट

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : ‘प्रशांतराव (Prashant Paricharak), तुम्ही म्हणताय म्हणून लक्ष्मण ढोबळे (Laxman Dhoble) भाजपमध्ये आहेत. पण आम्हाला तसं वाटत नाही आणि जाणवतंही नाही. त्यांच्या मनात काय चालू आहे, हे मला समजेना. तुम्हा दोघांनाच माहिती काय चाललंय ते,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपक साळुंखे (Deepak Salunkhe) यांनी ढोबळेंच्या सद्यास्थितीवर भाष्य केले. (Deepak Salunkhe pointed to Laxman Dhoble's grief)

रतनचंद शहा बॅंकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी साळुंखे बोलत होते. या वेळी भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, धनश्री परिवाराचे प्रा. शिवाजीराव काळुंगे, दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, जकाराया शुगरचे बिराप्पा जाधव, उमेश पाटील, लतीफ तांबोळी, सुभदा शहा आदी उपस्थित होते.

सोलापूर लोकसभेची पुढील वर्षी निवडणूक असून भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे विद्यमान खासदार आहेत. परंतु जात प्रमाणपत्राचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असताना ते लोकसभेची निवडणूक लढवणार का, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे सोलापूर लोकसभेला भाजप स्थानिक उमेदवार देणार की उपरा याविषयी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असतानाच साळुंखे यांनी केलेले विधान उपस्थितांमध्ये चर्चेला कारणीभूत ठरले.

मंगळवेढ्यात अनेक वर्ष आमदार आणि मंत्री म्हणून काम केलेले ढोबळे हे आपल्या भाषणात ‘पंढरपूरकरांनी लोकसभेला नाकारल्यानंतर एसटीने मंगळवेढ्यात आल्यानंतर (स्व.) रतनचंद शहा यांनी आपणाला आमदार केले, त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत’ असे नेहमी सांगत असतात. या कार्यक्रमात ढोबळेंनी प्रा. शिवाजीराव काळुंगे, दामाजीचे शिवानंद पाटील, जकारायाचे बिराप्पा जाधव यांच्यामुळे मंगळवेढ्यात चांगल्या पद्धतीची साखर निर्माण होऊ लागली. साखर धंद्यात आपल्याला विरोधक निर्माण होऊ नये, यासाठी ते काळजी घेतात, अशी टिपण्णी केली होती.

माजी नगराध्यक्षा अरूणा माळी, अनेक संकटांवर मात करून बँक चांगल्या पद्धतीने चालवणारे राहुल शहा यांचाही ढोबळे यांनी गौरव केला होता. तोच धागा पकडून दीपक साळुंखे यांनी ढोबळे यांच्या मनात नेमकं काय चालू आहे, हे समजेना, असे सूचक विधान केले होते. त्यावर उपस्थितांतून एकच हशा पिकला. हाच मुद्दा पकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यासपीठावरील सर्वांना दोन दोन मिनिटे बोलण्याची मर्यादा दिली. मात्र, हा नियम माजी मंत्री ढोबळे यांना लागू नसल्याचे सांगताना हल्ली ते शिस्तीच्या पक्षात असल्याने ते नियम पाळतात. पक्ष बैठकीत हात वर करावा लागतो, इतर पक्षासारखे नाही. होय म्हटले तर संधी असे सांगून ते शिस्त पाळतात, म्हटल्यावर आम्हीपण पाळतो, असे सांगितले.

राहुल शहा यांच्याविषयी प्रशांत परिचारक म्हणाले की, तुम्ही एकत्र आला नसाल इतके आम्ही दोघे एकत्र आहेत. आम्हा दोघांचे दुःख सारखेच आहे. मात्र ते राजकारणाचे नव्हे; तर बँकेचे आहे. राहुल शहा हे मनस्वी वेगळ्या स्वभावाचे आहेत, त्यांच्यावर टीका केल्यास ते मनाला लावून घेतात. तरीही आलेल्या संकटावर मात करून त्यांनी बँक चांगल्या पद्धतीने चालवली, अशा शब्दांत परिचारकांनी शहा यांचे कौतुक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT