Solapur, 18 March : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक दीपक वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. वैद्य हे जिल्हा परिषदेच्या उपळाई ठोंगे गटातून सर्वाधिक मताधिक्क्यांनी निवडून आले आहेत. मात्र, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट सरपंचपदाच्या लढतीत वैद्य यांचा निसटत्या १७ मतांनी पराभव झाला होता. गावाने नाकारले तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून आलेल्या वैद्य यांना थेट जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे.
माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे समर्थक असलेले दीपक वैद्य हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले तरुण नेतृत्व आहे. सोलापूर जिल्हा परिषद (Solapur Zilla Parishad) निवडणूक लढविण्यापूर्वी वैद्य यांनी २०२१ मध्ये उपळाई ठोंगे ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा निसटत्या १७ मतांनी पराभव झाला होता. त्यांना गावाने एक प्रकारे नाकारले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभावामुळे खचून न जाता दीपक वैद्य यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोमाने तयारी केली होती. त्यातून ते जिल्ह्यात सर्वाधिक ९९८४ मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. विशेष म्हणजे माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच सर्व जागा जिंकल्या होत्या, त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पहिल्यांदाच बार्शीकडे जाणार, हे निश्चित झाले होते.
धनगर समाजाचे दीपक वैद्य यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले असून आजही ते शेती करतात. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी नाव निश्चित झाल्यानंतरही ते शेतीकाम करत होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची मातीशी नाळ जुळलेली होती, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाला गवसणी घातल्याचे मानले जात आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षांचे ‘उत्तर’शी विशेष नाते
सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक वैद्य यांचे उत्तर सोलापूर तालुक्याशी कौटुंबीक नाते आहे. वैद्य यांचे आजोळ हे झेडपीचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचे गाव असलेले मार्डी हे आहे. याच मार्डीत त्यांचे बालपण गेले आहे. तसेच, उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज या गावाचे ते जावई आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षांचा उत्तर तालुक्यातील निकटचा संबंध आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.