Sangola Gram Panchayat Result  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gram Panchayat Result : सांगोल्यात आमदार शहाजीबापू पाटलांना धक्का; तीन ग्रामपंचायतींमध्ये पराभव

Shahaji Patil News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजीबापूंची चिंता वाढविणारे हे ग्रामपंचायतीचे निकाल आले आहेत.

Vijaykumar Dudhale

Sangola News : सांगोला तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायतींच्या निकालात आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. या तीनही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. या तीनही ठिकाणी शेकापचे पॅनेल विजयी झाले आहे. वाढेगाव या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीवर हरकत घेतली आहे, त्यामुळे निकाल लांबणीवर पडला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहाजीबापूंची चिंता वाढविणारे हे ग्रामपंचायतीचे निकाल आले आहेत. आता आमदार पाटील यांच्या चिकमहूद ग्रामपंचायतीकडे तालुक्याचे लक्ष आहे. (Defeat of MLA Shahaji Patil's panel in three Gram panchayats in Sangola)

सांगोला तालुक्यातील चिकमहूद, सावे, वाढेगाव आणि खवासपूर ग्रामपंचायतींसाठी रविवारी ८३.३७ टक्के चुरशीने मतदान झाले होते. गावगाड्याची सत्ता आपल्याच हाती राहील, असा दावा शेकाप आणि शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकापच्या पॅनेलने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेकाप आणि त्यांच्या मित्रपक्षाने सावे, आणि खवासपूर ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. वाढेगाव या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीवर हरकत घेतली आहे, त्यामुळे निकाल लांबणीवर पडला आहे. आमदार पाटील यांचे गाव असलेल्या चिकमहूद ग्रामपंचायतीची मतमोजणी अद्याप सुरू आहे. त्या ठिकाणी शहाजीबापू पाटील यांचे पॅनेल आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

तालुक्यातील सावे ग्रामपंचायत ही पारंपरिक शेकापचा गड मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या गावात शेतकरी कामगार पक्षाची सत्ता होती. ती या वेळीही त्यांनी टिकवली आहे. आताही शेतकरी कामगार पक्षाच्या दोन गटांतच या ग्रामपंचायतीसाठी लढत झाली होती. असे असूनही सावे ग्रामपंचायतीमध्ये शेकापने बाजी मारली आहे.

खवासपूर ग्रामपंचायत मागील दोन पंचवार्षिकपासून आमदार पाटील गटाकडे होती. या निवडणुकीत मात्र शेकापने सरपंचपदासह १०-१ अशी सत्ता मिळविली आहे. खवासपूर ग्रामपंचायत ही आमदार पाटील यांच्या चिकमहूद या पंचायत समिती गणामध्ये येते. त्या ठिकाणी पाटील गटाला मोठ्या पराभावला सामोरे जावे लागले आहे.

शेकापने निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्या तुलनेत सत्तेमुळे शिवसेना गाफील राहिली होती. तसेच, सरपंचपदावरून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेनेत बिनसले, त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या सर्व उमेदवारांचे अर्ज माघारी घेत शेकापला पाठिंबा दिला. त्यावेळी ‘आम्ही जिकडे तिकडे गुलाल’ असा दावा राष्ट्रवादीचे वसंत जरे यांनी केला होता. त्यानुसार शेकापने बाजी मारल्याचे दिसून येते.

वाढेगाव ग्रामपंचायत ही १३ सदस्यांची आहेत. या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या मतमोजणीवर हरकत घेतली आहे, त्यामुळे निकाल लांबणीवर पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT