Udayanraje and G kishan Reddy
Udayanraje and G kishan Reddy Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : ''शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करा'' ; उदयनराजेंची पर्यटनमंत्र्यांकडे मागणी!

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

Shiva Swarajya Circuit : केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेअंतर्गत बुद्ध सर्किट, रामायण सर्किट अशी सर्किट पर्यटकांसाठी विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिव स्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale ) यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.

खासदार उदयनराजे यांनी जी. किशन रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच जगभरातील पर्यटकांनी प्रत्यक्ष भेट देऊन समजावून घ्यावा, अशी इच्छा प्रदर्शित केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj), छत्रपती संभाजी महाराज, थोरले शाहू महाराज या सर्वांचेच शौर्य, पराक्रम आणि दैदीप्यमान इतिहासाचा प्रसार व्हावा आणि त्यायोगे रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उन्नती व्हावी. त्यासाठी मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना त्यांनी मांडली.

या संकल्पित योजनेच्या सुरुवातीला स्वराज्याच्या राजधानी असणाऱ्या सर्व ठिकाणांचे सर्किट तयार करून दुसर्‍या टप्प्यात स्वराज्यातील प्रमुख घटना जिथे घडल्या त्या महाराष्ट्रातील आणि राज्याबाहेरील सर्व ठिकाणांचा त्यात समावेश करावा. उत्तरेत पानिपत, आग्रा येथपासून ते दक्षिणेतील तंजावरपर्यंतच्या सर्व ठिकाणांचा अभ्यास करून त्यांचे एक सर्किट तयार करण्यात यावे. त्यामुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणांना भेटी देतील, असे खासदार उदयनराजे यांनी पर्यटनमंत्र्यांना सांगितले.

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी व कास पठारासह अनेक पर्यटनस्थळे असून, त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास जास्तीत जास्त पर्यटक सातारा जिल्ह्यात येतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच सातारा जिल्ह्यात केंद्र शासनाच्या वतीने टूरिजम नॅशनल कॉन्क्लेव्ह आयोजित करून स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली.

या सर्व मागण्यांना जी. किशन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, “त्या भागातील पर्यटनवाढीसाठी तुम्ही जे प्रयत्न कराल त्यास केंद्र शासनाचे कायम सहकार्य राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT