Solapur, 29 March : विधीमंडळाचे अधिवेशन संपताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (ता.29 मार्च) देवदर्शन केले. सकाळी तुळजा भवानीचे, तर दुपारी विठ्ठल-रुक्मिणी आणि त्यानंतर नीरा नरसिंहपूर येथील कुलदैवत असलेल्या लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन केले. त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड आणि पंढरपूर कॉरिडॉर कामाचा आढावाही घेतला. या धावपळीत त्यांनी भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत माजी आमदार प्रशांत परिचारक यांची घरी जाऊन आवर्जून भेट घेतली आणि दुःखाच्या प्रसंगातही सोबत असल्याचे सांगून मोठा आधार दिला.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. परिचारक यांचे वडिल प्रभाकर परिचारक यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे फडणवीसांना पंढरपूरला येत आले नव्हते. मात्र, अधिवेशन संपताच फडणवीस पंढरपूर दौऱ्यावर आले आणि त्यांनी परिचारक यांचे घरी जाऊन सांत्वन केले.
वडिलांच्या निधानामुळे प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखद प्रसंगात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे एका नेत्याचे कर्तव्य असते, हे लक्षात घेऊन फडणवीसांनी प्रशांत परिचारक यांना खंबीर आधार दिला. यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली.
प्रशांत परिचारक हे २०२१ च्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे प्रबळ दावेदार होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचे पोटनिवडणूक जिंकण्याचा चंग बांधला होता. मात्र, भाजपकडून माजी आमदार परिचारक यांच्याबरोबरच समाधान आवताडेही इच्छूक होते. फडणवीस यांनी परिचारक यांची समजून घालून आवताडेंना उमेदवारी दिली होती आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीची निर्णायक ताकद असूनही समाधान आतवाडेंना निवडून आणण्यात परिचारक यांनी मोठी भूमिका निभावली होती.
पोटनिवडणुकीनंतर परिचारक यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येईल, असे सांगितले जात होते. मात्र, संधी असूनही परिचारक यांना पक्षाकडून न्याय मिळू शकला नाही. त्यानंतर आलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून त्यांना ऑफर होती. मात्र, भाजपवर असलेली निष्ठा परिचारक यांनी ढळू दिली नाही. विरोधी पक्षाचे ऑफर नाकारून त्यांनी माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी प्रयत्न केले.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारीत डावलण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रशांत परिचारक यांनी केला होता. तसेच, विधान सभेच्या निवडणुकीवेळी परिचारक यांनी पंढरपूरमधून निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, तत्कालीन समीकरणे लक्षात घेऊन भाजपकडून समाधान आवताडेंनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. या वेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीडून परिचारक यांना ऑफर होती. पण त्यावेळी त्यांनी भाजपवर निष्ठा राखली.
विधानसभेची निवडणुकीवेळी परिचारक यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपुरात परिचारक वाड्यावर आले होते. त्या वेळी परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील, असा शब्द त्यांनी जाहीरपणे दिला होता. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत परिचारक यांना संधी मिळेल, असे वाटत असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यातील नेत्यांना संधी देण्यात आली, त्यामुळे परिचारक यांच्याकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आले. मात्र फडणवीस यांनी आज परिचारक यांचे घरी जाऊन सांत्वन करत आपण परिचारक यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.