jaykumar gore (1).jpg Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Guardian Minister : माढा पुन्हा काबीज करण्यासाठी फडणवीसांचा 'मास्टर स्ट्रोक'; मोहिते पाटील विरोधक गोरेंकडे सोलापूरची धुरा!

Maharashtra Guardian Minister List : जयकुमार गोरे यांच्या निवडीने भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. गोरे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जवळचे मित्र आहेत. माढ्यातून निंबाळकर विजय व्हावेत, यासाठी गोरे यांनी जीवाचे रान केले होते.

Vijaykumar Dudhale

Solapur News : पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणीस यांनी आपल्या विश्वासातील जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवली आहे. जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची निवड करताना माढा लोकसभा मतदारसंघ पुन्हा सर करण्याची स्ट्रॅटेजी भाजपने आखल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे परममित्र असणाऱ्या गोरे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवून लोकसभा निवडणुकीपासून उधळलेल्या मोहिते पाटील यांच्या वारूला लगाम घालण्याची रणनीतीही दिसून येत आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या सोलापूरच्या (Solapur Guardian Minister) पालकमंत्रीपदासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूरचे आमदार तथा क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, सोलापूरचे पालकमंत्रिपद भाजपने राखण्यात यश मिळवत जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवले आहे.

जयकुमार गोरे यांच्या निवडीने भाजपने एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. गोरे हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे जवळचे मित्र आहेत. माढ्यातून निंबाळकर विजय व्हावेत, यासाठी गोरे यांनी जीवाचे रान केले होते. त्यासाठी त्यांनी मतदारसंघातील अनेक राजकीय नेत्यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता. वैयक्तिक प्रतिष्ठा पणाला लावत गोरे यांनी निंबाळकर यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना त्यात अपयश आले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभेतील पराभव त्यांच्या स्वतःबरोबर गोरे यांच्यासाठीही चिंता वाढविणारा होता.

दुसरीकडे अनेक प्रयत्न करूनही धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढ्यातून बाजी मारली होती. तो पराभव भाजप आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्थानिक नेत्यासोबतच राज्यातील नेत्यांच्याही जिव्हारी लागला होता. तसेच विधानसभा निवडणुकीतही फडणवीसांचे लाडके राम सातपुते यांचाही निसट्या मताने पराभव झाला होता. त्या दोन्ही पराभवाची सल पुसून काढण्यासाठी देवेंद्र फडवणीस यांनी आपल्या विश्वासातील जयकुमार गोरे यांच्याकडे सोलापूरच्या पालकत्वाची जबाबदारी दिली आहे.

गोरे यांच्या माध्यमातून मोहिते पाटील यांचे तसेच माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्चस्वला मोडीत काढण्याचाही प्रयत्न भाजपाकडून आगामी काळात होणार, हे स्पष्ट आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत, तर दोन मतदारसंघात हे महायुतीचे आमदार आहेत. यात स्वतः जयकुमार गोरे यांचा माण खटाव, तर फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराचा समावेश आहे.

मात्र, सांगोला, करमाळा, माढा, माळशिरस यातील तीन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, तर सांगोल्यात राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हे आमदार आहेत. त्यामुळे माढा पुन्हा सर करण्यासाठी भाजपाने स्ट्रॅटेजी आखली असली तरी भाजपसाठी ती तेवढी सोपे गोष्ट नाही.

मोहिते पाटलांची कोंडी होण्याची शक्यता

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव केला. पराभवानंतर निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांना टार्गेट करत त्यांच्या विरोधकांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले राम सातपुते यांनीही थेट मोहिते पाटील यांच्यावरच हल्लाबोल सुरु केला आहे.

त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हे अजूनही भाजपमध्ये असले तरी या मतदारसंघातील मोठी शक्ती म्हणून विरोधातील मोहिते पाटील यांना नामोहरम करण्याचे प्रयन होणार, हे उघड गुपित आहे. विशेषत: निधीच्या माध्यमातून मोहिते पाटील यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही‌.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT