Solapur, 08 June : पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चॅलेंज देणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महत्वपूर्ण डाव टाकला आहे. सोलापूर जिल्ह्यातील लिंगायत समाजाच्या नगरसेवकांची लक्षात घेऊन थेट होटगी मठाचे काशी जगदगुरु डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी यांचे आशीर्वाद घेतले. याशिवाय सोलापूर शहरातील काही भाजप नेत्यांचीही त्यांनी भेट घेतल्याचे पुढे आले आहे, त्यामुळे मोहिते पाटील यांच्या मोर्चेबांधणीला किती यश येते, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात लढत होत आहे. महायुतीचे संख्याबळ पाहता राऊत यांचे पारडे जड मानले जाते. मात्र, गुप्त मतदान पद्धतीमुळे भाजपकडून कमालीची काळजी घेतली जात आहे.
दुसरीकडे मोजक्या शिलेदारांसह धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोर्चेबांधणीला वेग दिला आहे. सोलापूर शहरात भाजपचे नगरसेवक, काही नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर त्यांनी थेट होटगी मठ गाठत काशी जगदगुरु डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी यांचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी काही राजकीय चर्चा झाला का, याची माहिती मिळू शकली नाही. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांचा होटगी मठ दौरा विशेष ठरत आहे.
होटगी मठात मोहिते पाटील यांच्यासोबत उमेदवार वसंतराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष महेश गादेकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, अक्कलकोटचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जून पाटील, भाजपचे नगरसेवक शिवानंद पाटील हेही उपस्थित होते. त्यामुळे होटगी मठ भेटीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
होटगी मठाचे काशी जगदगुरु डॉ. मल्लिकार्जून शिवाचार्य महास्वामी यांचा शब्द लिंगायत समाजात प्रमाण मानला जातो. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी महास्वामी महाराजांची भेट घेणे, हा राजकीय संदेश मानला जात आहे. आता मठातून कोणता संदेश जातो, हेही पाहावे लागणार आहे.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी भाजपच्या अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत, त्यातून त्यांनी मतांची जुळणी सुरू केली आहे. आता त्याला किती यश येते, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.