

Solapur, 08 June : सोलापूर विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाला बिनविरोधची अपेक्षा असलेली निवडणूक खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलेल्या आव्हानामुळे रंगतदार बनत चालली आहे, त्यामुळे भाजपचे नेतेही सावध झाले आहेत. त्यातूनच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आज (ता. ०८ जून) आमदार विजयकुमार देशमुख यांची चौथ्यांदा भेट घेतली आहे. या भेटीनंतर देशमुख हे राऊतांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
या भेटीनंतर राजेंद्र राऊत यांच्यासोबत आमदार विजयकुमार देशमुख (Vijaykuamr Deshmukh) हे पंढरपूर, मंगळेवढा, सांगोला येथे प्रचारासाठी एकत्रिपणे गेले आहेत. राऊत हे देशमुखांचे चांगले मित्रही आहेत, त्यामुळे मित्राच्या प्रचारासाठी देशमुखांनी सक्रीय सहभाग घेतल्याचे मानले जात आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर मतदारसंघातून भाजपकडून बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut), तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख हे निवडणूक लढवत आहेत. एकट्या भाजपकडे ३०७ मते आहेत, महायुतीमधील इतर दोन पक्षांसह हे संख्याबळ ५०० च्या पुढे जाते, त्यामुळे आकडेवारीनुसार तरी ही निवडणूक एकतर्फी वाटते. मात्र, गुप्त पद्धतीमुळे या निवडणुकीत काहीही होऊ शकते, त्यामुळे महायुतीकडून कमालीची दक्षता घेतली जात आहे.
विजयकुमार देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील घडामोडींपासून अलिप्त होते. विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंशी मतभेद होते, त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणूक निर्णय प्रक्रियेपासून ते लांबच होते. मात्र, राजेंद्र राऊत यांना तिकिट मिळताच हे सक्रीय झाल्याचे दिसून येते.
राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विजयकुमार देशमुख उपस्थित होते. ते पालकमंत्र्यांसोबत पक्षाच्या कार्यक्रमात काही महिन्यांनंतर दिसले होते. उमेदवारी मिळाल्यापासून आजपर्यंत राऊत हे चार वेळा देशमुख यांना भेटल्याची माहिती आहे.
या भेटीत दोघांमध्ये विधान परिषदेच्या निवडणूक रणनीतीवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. देशमुख हे लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात, त्यामुळे लिंगायत नगरसेवकांची संख्याही मोठी आहे, त्यामुळे देशमुख यांचे सक्रीय होणे, भाजप आणि पर्यायाने राऊत यांच्यासाठी महत्वाची गोष्ट मानली जात आहे.
या भेटीवेळी पालिकेतील सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी सभागृह नेते नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक राजकुमार पाटील, नगरसवेक शेखर इगे, मंडलाध्यक्ष दत्तात्रय बडगू, नगरसेवक बारबोले, प्रसाद कुलकर्णी, किरण पवार, अजित गायकवाड, सुभाष पवार, संग्राम काशिद, सनी गज्जम आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.