Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीला आजपासून प्रारंभ झाला. इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. एकीकडे राखडलेली निवडणूक होत असताना दुसरी जागावाटप, सभासद संख्याबळ यावरून महायुतीमधीलच घटक पक्षामध्ये वादाचे फटाके फुटत आहेत.
मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी, जनसुराज्य व शिवसेनेचे ठराव सांगितल्याने भाजपला थेट इशारा दिला आहे. यामुळे तुम्हाला यायचं असेल तर जा, अन्यथा गरज नाही, असा इशाराच दिल्याचे बोलले जाते. त्यावरून भाजपचे नेते व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रक काढून मुश्रीफ यांच्यावर पलटवार केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष मिळून ३५०० ठराव असल्याचे जाहीरपणे सांगण्यात आले. या वक्तव्यामागचा उद्देश काय? यातून भारतीय जनता पक्षाची ताकद गौण असल्याचा संदेश दिला जात आहे का? या वक्तव्यांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून, भाजपाला वेगळे गृहीत धरून काही स्वतंत्र राजकीय गणिते मांडली जात आहेत? तसे नसेल तर अशा आकड्यांचे राजकारण करण्यामागचे कारण जनतेसमोर स्पष्ट झाले पाहिजे, अशी अपेक्षा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.
सोमवारी मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपला वगळून ३५०० ठराव आपल्याकडे असल्याचे सांगितले होते. त्याला आज खासदार महाडिक यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले. महायुतीच्या भवितव्याबाबत आणि आगामी निवडणुकांबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळूनच घेतील. त्यामुळे स्थानिक पातळीवरून कोणीही अंतिम भूमिका जाहीर करण्याचा प्रयत्न करू नये. राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य या तिन्ही पक्षांची भूमिका एकच आहे, असे वाटत नाही. त्यामुळे शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या नेतृत्वानेही याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असे या पत्रकात म्हटले आहे.
महायुतीत लहान, मोठा नाही यापूर्वीही काही वेळा 'अदृश्य शक्ती', 'मोठा भाऊ' अशा संकल्पना पुढे आणण्याचा प्रयत्न झाला आहे. महायुतीत कोण मोठा आणि कोण लहान, हा प्रश्न नाही. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे परस्पर सन्मान आणि विश्वास. पण वारंवार अशा प्रकारची भाषा वापरून विशिष्ट पक्षाचे किंवा नेतृत्वाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे, असेही यात म्हटले आहे.
डोंगळेंच्या राजीनाम्यानंतर अध्यक्ष कोण झाले आज महायुतीच्या अध्यक्षपदाबाबत विविध कथा सांगितल्या जात आहेत. मात्र, त्या काळात याबाबात सर्वाधिक ठाम भूमिका कोणी घेतली होती, हेही विसरून चालणार नाही. अरुण डोंगळे हे कोणत्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत होते? त्यांनी अध्यक्षपदाची अट घालून राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर अध्यक्ष कोण झाले? हे संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. त्यामुळे त्या प्रक्रियेतील राजकीय निर्णयांचे खापर मुख्यमंत्री किंवा तथाकथित 'अदृश्य शक्ती'वर फोडण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.
ही भूमिका टिकणार नाही महायुतीच्या नावाने एकीकडे एकत्र राहण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे भाजपला वगळून पर्यायी राजकीय समीकरणांची चर्चा करायची, ही भूमिका दीर्घकाळ टिकू शकत नाही, भाजपला गृहीत धरण्याचा किंवा ताकद दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करू नये, असा इशाराही पत्रकात दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.