

तळेगाव दाभाडे : माजी राज्यमंत्री, ज्येष्ठ राजकीय नेते, मावळच्या राजकारणातील ज्येष्ठ मार्गदर्शक मदनलालजी हरकचंदजी बाफना (वय ८६) यांचे आज निधन झाले. उद्या (मंगळवारी) त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, चार मुली, पाच भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे
त्यांच्या निधनाने मावळच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, मावळच्या राजकारणातील एक महत्त्वाचे पर्व संपले आहे.
मदनलालजी बाफना यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात वडगाव ग्रामपंचायतीपासून झाली. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काही काळ वकिली केली. त्यानंतर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली.
पुण्यातील बी.एम.सी.सी. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी मैत्री झाली. पुढे ही मैत्री त्यांच्या राजकीय वाटचालीतही महत्त्वाची ठरली. वडगाव ग्रामपंचायतीपासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार आणि राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. १९७९ मध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. मावळ तालुका तसेच पुणे जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक कामात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
१९८५ मध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवर ते मावळ विधानसभा मतदारसंघातून प्रथम आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९० मध्ये पुन्हा त्यांनी मावळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आमदार म्हणून त्यांनी मावळातील विविध प्रश्न विधिमंडळात मांडत मतदारसंघाच्या विकासासाठी योगदान दिले.
१९८९ मध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. महसूल व नगरविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर विधी व न्याय तसेच अर्थ राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ठाणे आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
काँग्रेसमधील प्रदीर्घ राजकीय वाटचालीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या काळातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. पक्षाच्या संघटनात्मक उभारणीत योगदान देत त्यांनी प्रदेश पातळीवरील जबाबदारीही सांभाळली.
राजकारणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध होता. सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते आणि विविध सामाजिक घटकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध हे त्यांच्या सार्वजनिक जीवनाचे वैशिष्ट्य होते. अनेक कार्यकर्त्यांसाठी ते मार्गदर्शक आणि आधारस्तंभ होते.
त्यांच्या निधनाने मावळने अनुभवी राजकीय नेतृत्व, समाजहिताची जाण असलेले व्यक्तिमत्त्व आणि अनेकांना मार्गदर्शन करणारा ज्येष्ठ नेता गमावला आहे. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कार्याची नोंद मावळच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात कायम राहील.
त्यांचे पार्थिव मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी वडगाव येथील बाफना महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.