Rajan Patil-Umesh Patil-Dhananjay Mahadik
Rajan Patil-Umesh Patil-Dhananjay Mahadik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mohol Politics : धनंजय महाडिक, उमेश पाटलांची घोषणा हवेत; मोहोळमध्ये ‘आरपी’ पॅटर्नचीच चलती!

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली. या निमित्ताने माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. सर्वपक्षीय विस्कळीतपणा माजी आमदार राजन पाटील यांच्या पथ्यावर पडल्याची चर्चा आता तालुक्यात सुरू झाली आहे. (Dhananjay Mahadik, Umesh Patil's announcement to contest the election was lost in the air)

नुकत्याच झालेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेत खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी इथून पुढच्या निवडणुका राजन पाटील यांच्या विरोधात लढविणार ही केलेली घोषणा हवेतच विरली. त्यामुळे येत्या नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा ‘आरपी’ पॅटर्न चालणार काय, अशी चर्चा होऊ लागली आहे.

मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी १८ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. मोहोळ नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार पाटील यांनी ग्रामीण व शहराचा समतोल राखत सर्व १८ नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. या बाजार समितीची स्थापना १९५४ मध्ये झाली असून तेव्हापासून (स्व.) लोकनेते बाबुराव (अण्णा) पाटील व त्यानंतर त्यांचे चिरंजीव माजी आमदार राजन पाटील यांनी ७५ वर्ष बाजार समितीवर वरचष्मा राखला, हे काय कमी नाही.

मोहोळ बाजार समितीच्या जवळच असलेल्या मोडनिंब, कुर्डूवाडी, दक्षिण, उत्तर, वैराग या बाजार समित्यांची वार्षिक उलाढाल व मोहोळ बाजार समितीची उलाढाल यांची तुलना केली, तर पाच टक्केसुद्धा शेतीमाल मोहोळ बाजार समितीत विक्रीसाठी येत नाही, त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नावर मर्यादा आहेत. त्याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. केवळ अंतर्गत रस्ते केले व नवीन गाळे बांधले म्हणजे विकास झाला, असे होत नाही.

माजी आमदार पाटील हे सध्या महाविकास आघाडीत आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मात्र, त्यांनी अद्याप प्रवेश केला नाही. तालुक्यासाठी लागणारा मोठा निधी त्यांनी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून खेचून आणला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निधीच्या बाबतीत मोहोळ तालुक्याला झुकते माप दिले आहे. मात्र, आणलेल्या निधीचे श्रेय आमदार माने भाजपला देत नाहीत, ते केवळ पवारांच्या प्रयत्नाने मिळाल्याचे मार्केटिंग करतात. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. नेतेमंडळीत असलेली उदासीनता कार्यकर्त्यातील संभ्रम व नाराजी यामुळे बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्याची चर्चा आहे.

खासदार महाडिक यांच्याकडून मोहोळ तालुक्याच्या वेळप्रसंगी मतदारसंघाच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे, त्यांनी केवळ कुरुल ते पंढरपूर या रस्त्यासाठीच निधी मंजूर करून घेतला आहे. सध्या महाडिक हे कोल्हापुरातील राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुंतले आहेत, असे असले तरी बाजार समितीच्या निवडणुकीची चर्चा तरी होणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाल्याचे ऐकवत नाही.

दरम्यान, बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही ग्रामपंचायत मतदारसंघातून जरी उमेदवारी दाखल केली असती तरी काही जागा मिळाल्या असत्या. मात्र, इतर मतदारसंघात प्राबल्य नसल्याने हात दाखवून अवलक्षण करण्यापेक्षा निवडणूक न लढविलेलीच बरी अशी प्रतिक्रिया एका भाजप नेत्याने दिली. या निवडणुकीत भाजप नेते संजय क्षीरसागर, उमेश पाटील, विजयराज डोंगरे, मानाजी माने यांचे अस्तित्व त्यांच्या भागापुरतेसुद्धा दिसले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT