शिरूर नगर परिषद निवडणुकीत धारिवाल घराण्याची माघार घेतल्याने, महाविकास आघाडी व महायुतीचे स्वतंत्र पॅनेल उभे राहत नवीन राजकीय समीकरणांची निर्मिती झाली आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस यांच्या सहकार्याने अशोक पवार हे स्वतंत्रपणे मैदानात उतरले, तर भाजप व शिंदे गटानेही स्वतंत्र पॅनेल बनवले आहे.
नगराध्यक्षपदासाठी अनेक माजी पदाधिकाऱ्यांची जोरदार चढाओढ दिसत असून, सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार थेट संघर्षात आहेत.
Shirur, 21 November : ज्या धारिवाल घराण्याभोवती गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ शिरूर नगर परिषदेची निवडणूक केंद्रित होत असे, त्या कुटुंबातील आताचे प्रतिनिधी प्रकाश धारिवाल यांनी विविध कारणास्तव निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने रिक्त झालेला राजकीय अवकाश व्यापण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सरसावले आहेत. एकसंध महाविकास आघाडी विरुद्ध बिघाडी झालेली महायुती, अशा राजकीय पटलावर नगर परिषद निवडणुकीची समीकरणे रंगू लागली आहेत.
शिरूर (Shirur) नगर परिषदेवर २००७ पासून प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वात शिरूर शहर विकास आघाडीचे एकहाती वर्चस्व होते, त्यापूर्वी त्यांचे वडील दिवंगत उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांचा पगडा होता. त्यांनी सलग २० वर्षे नगराध्यक्षपद भूषविले होते. त्यामुळे नगर परिषदेचे राजकारण कायमच धारिवाल घराण्याभोवती केंद्रित होत होते. इतर राजकीय पक्ष व वरिष्ठ नेत्यांनी कधीही नगर परिषद राजकारणात सवतासुभा निर्माण न करता धारिवाल यांच्यासोबत राहण्यातच धन्यता मानल्याने नगर परिषदेच्या मैदानात राजकीय पक्ष अभावानेच उतरले होते.
गेल्या दोन निवडणुकांत माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने (BJP) सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले होते. त्यामुळे भाजपच्या कमळाव्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांचे चिन्ह अभावानेच येथे आढळले.
यावेळच्या निवडणुकीत धारिवालांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने व त्यांच्या शहर विकास आघाडीत महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या भूमिकेतून माजी आमदार अशोक पवार यांनी प्रथमच स्वतंत्रपणे नगर परिषदेच्या आखाड्यात उडी घेतली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व कॉंग्रेसला काही जागा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून अशोक पवार यांनी पॅनेल उभे केले आहे. धारिवाल समर्थकांच्या सहभागाने या पॅनेलचा बोलबाला आहे. आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनीही प्रथमच नगर परिषद निवडणुकीची सूत्रे हाती घेताना मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, खालपासून वरपर्यंत महायुतीअंतर्गत स्वबळाचा नारा घुमू लागल्याने ही चर्चा फिसकटली.
शिरूर नगरपरिषदेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससह भाजप व शिवसेनेने स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. शिवसेनेने ऐनवेळी उडी घेतल्याने शिवसेनेला सर्व जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीतील फटक्यामुळे धडा घेत मविआ एकसंध झाली असताना सर्वच पातळ्यांवर काहीशा बळकट स्थितीत आलेल्या महायुतीतील घटक पक्षांनी पक्षचिन्हांवर स्वतंत्र उमेदवार उभे केल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची चिन्हे प्रचारात दिसू लागली आहेत.
गत दोन निवडणुकांत प्रतिस्पर्धी असलेल्या लोकशाही क्रांती आघाडीने मतदानाच्या कमी टक्केवारीच्या कारणास्तव तलवार म्यान केली आहे. पण त्याचवेळी काही उमेदवारांना हाताशी धरून जनता दल आणि ‘आप’ने शिरूर परिवर्तन आघाडी, तसेच मनसे कार्यकर्त्यांनी जनहित आघाडीच्या माध्यमातून काही जागांवर पर्याय देण्याची चाचपणी चालवली आहे. प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखालील शिरूर शहर विकास आघाडी निवडणूक रिंगणात नसली तरी आघाडीचे समर्थक रिंगणात आहेत.
नगराध्यक्षपदासाठी आखाड्यात उतरलेल्या माजी नगराध्यक्षा वैशाली दादाभाऊ वाखारे (अपक्ष), माजी नगराध्यक्षा सुवर्णा राजेंद्र लोळगे (भाजप), माजी उपनगराध्यक्षा अलका सुरेश खांडरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष), माजी नगरसेविका रोहिणी किरण बनकर (शिवसेना) यांच्यासह ऐश्वर्या अभिजित पाचर्णे या शिरूर शहर विकास आघाडीच्याच समर्थक आहेत.
मागील वेळेचे पक्षीय बलाबल (एकूण जागा २१)
शिरूर शहर विकास आघाडी : १७
भाजप : २
लोकशाही क्रांती आघाडी : १
अपक्ष : १
नगरसेवक संख्या आता : २४
नगराध्यक्ष आरक्षण : इतर मागास प्रवर्ग (महिला)
प्र.1 — धारिवाल घराण्याची निवडणुकीत काय भूमिका आहे?
→ प्रकाश धारिवाल यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असून त्यांचे समर्थक मात्र रिंगणात आहेत.
प्र.2 — कोणत्या पक्षांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहेत?
→ राष्ट्रवादी (शरद पवार), भाजप, शिवसेना यांसह अनेक आघाड्यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहेत.
प्र.3 — नगराध्यक्षपदासाठी कोणत्या प्रमुख महिला उमेदवार आहेत?
→ वैशाली वाखारे, सुवर्णा लोळगे, अलका खांडरे, रोहिणी बनकर आणि ऐश्वर्या पाचर्णे.
प्र.4 — पूर्वी शिरूर राजकारणाचा प्रमुख केंद्रबिंदू कोण होता?
→ धारिवाल घराणे मागील पन्नास वर्षांपासून राजकारणाचे केंद्रबिंदू होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.