Solapur, 24 August : अस्तित्वात असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये (सोसायटी) आपली माणसं घुसविणे किंवा नव्याने मोठ्या प्रमाणात (बल्क) सोसायट्या काढणे, या दोनच मार्गांनी सहकारात प्रवेश मिळतो. नव्याने सोसायट्या काढता येतात आणि न्यायालयाच्या पातळीवर टिकविताही येतात, याचा पॅटर्नच माजी मंत्री (कै.) दिगंबर बागल यांनी सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातून घालून दिला आहे. सहकारातील बागल पॅटर्न यशस्वी झाल्याने नंतरच्या काळात याच पॅटर्नची अंमलबजावणी दक्षिण सोलापूर, मंगळवेढा व अक्कलकोट तालुक्यातही दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्र आणि राजकारण सहकारमहर्षी (स्व.) शंकरराव मोहिते-पाटील व (स्व.) नामदेवराव जगताप यांनी गाजविले आहे. त्यामुळेच माळशिरसच्या सहकारावर मोहिते-पाटील आणि करमाळ्याच्या सहकारावर जगताप यांचे आजही वर्चस्व कायम आहे.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या करमाळा सोसायटी मतदारसंघातून (कै.) नामदेवराव जगताप यांनी तब्बल ४० वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधनानंतर १९८६ मध्ये एक टर्म भगवान शिंदे यांना संधी मिळाली. त्यानंतर मात्र १९९३ पासून २०१८ पर्यंत या मतदारसंघातून नामदेवराव जगतापांचे चिरंजीव तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीच प्रतिनिधित्व केले आहे.
करमाळ्याच्या सहकाराचा गड राखणारे ‘गडकरी’ हे जगतापच ठरले आहेत. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करताना आरोपाचा एकही डाग लागू न देणाऱ्या मोजक्या संचालकांमध्ये जयवंतराव जगताप यांचा आवर्जून उल्लेख केला जातो.
जगतापांचा बालेकिल्ला असलेल्या करमाळ्यातून १९९५ मध्ये पहिल्यांदा दिगंबर बागल हे अपक्ष आमदार झाले. डीसीसी बॅंकेच्या करमाळा सोसायटी मतदारसंघात जयवंतराव जगताप विरुद्ध दिगंबर बागल यांच्यात १९९९ मध्ये निवडणूक झाली होती. या मतदारसंघातील सर्वांत चुरशीची निवडणूक म्हणून याकडे पाहिले जाते.
या निवडणुकीत ९३ पैकी ५६ मते जगतापांना तर ३७ मते बागल यांना मिळाली. डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीत पराभूत झालेले बागल १९९९ मध्ये पुन्हा अपक्ष आमदार झाले. पुढे राज्यमंत्रीही झाले. परंतु, त्यांना सोसायटी मतदारसंघातून डीसीसीवर संचालक होता आले नाही. पुढे २००४ मध्ये जयवंतराव जगताप करमाळ्यातून आमदार झाले आणि २००५च्या डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीत पुन्हा संचालक म्हणून विजयी झाले.
डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीतील पराभवानंतर तालुक्याच्या सहकारात दमदारपणे उतरण्यासाठी (कै.) बागल यांनी १९९९ मध्ये नव्या २१ सोसायट्यांची स्थापना केली. सोसायट्या स्थापन झाल्या, परंतु बँकेच्या सभासदत्वासाठी जगताप-बागल असा मोठा संघर्ष झाला. या संघर्षात कालांतराने बागल जिंकले. पण डीसीसी बॅंकेवर संचालक म्हणून जाण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. नव्या सोसायट्या स्थापन करण्यासाठी, स्थापन केलेल्या सोसायट्या टिकविण्यासाठी हा संघर्ष इतर तालुक्यांत संदर्भ म्हणून वापरला जात आहे.
अखेर जगताप-बागलांची डीसीसीत एकत्रित एन्ट्री
दिगंबर बागल यांचे २००५ मध्ये अकाली निधन झाले. त्यानंतर २००९ मध्ये त्यांच्या पत्नी श्यामल बागल करमाळ्याच्या आमदार झाल्या. डीसीसी बँकेच्या २०१० च्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदारसंघातून जयवंतराव जगताप, तर महिला प्रतिनिधी मतदारसंघातून रश्मी बागल असे सूत्र जुळले. (माजी राज्यमंत्री दिगंबर बागल यांचे जिल्हा बॅंकेवर संचालक म्हणून जाण्याचे स्वप्न त्यांची कन्या रश्मी बागल यांनी पूर्ण केले) २०१५ च्या निवडणुकीतही हेच सूत्र राहिले. या सूत्रामुळे जगताप आणि बागल दोघेही जिल्हा बँकेचे संचालक झाले.
डीसीसी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी करमाळ्यातील ११३ सोसायट्या पात्र ठरल्या आहेत. यातील निम्म्याहून अधिक सोसायट्या जगताप यांच्याकडे आहेत. त्या खालोखाल रश्मी बागल, माजी आमदार संजयमामा शिंदे व आमदार नारायण पाटील यांच्या गटाकडे सोसायट्या आहेत. करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीत झालेला जगताप-बागल वादही आता जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे जगताप यांच्यासाठी डीसीसीची आगामी निवडणूक फक्त औपचारिकताच मानली जात आहे.
जिल्ह्यातील बल्क सोसायट्या व स्थापन करणारे नेते
करमाळा, २१ : (कै.) दिगंबर बागल, तत्कालीन आमदार
दक्षिण सोलापूर, १५ : सुरेश हसापुरे, डीसीसीचे तत्कालीन संचालक
मंगळवेढा, २१ : समाधान आवताडे, आमदार
अक्कलकोट, ४० : सचिन कल्याणशेट्टी, आमदार
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.